Amir Khan : तिसऱ्या लग्नाच्या चर्चांनी बी-टाउन तापले आहे. 60 वर्षीय अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. दोन विवाह आणि त्यानंतर दोन्ही पत्नींपासून विभक्त झाल्यानंतर आमिर आता नव्या नात्यात स्थिरावले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत ते गंभीर रिलेशनशिपमध्ये असून दोघे सध्या लिव-इनमध्ये राहत असल्याची चर्चा रंगत आहे.
आमिर खान यांनी गेल्या वर्षी आपल्या 60व्या वाढदिवशी गौरीसोबतच्या नात्याची पहिल्यांदाच खुलेआम कबुली दिली होती. गेली जवळपास 20 वर्षे दोघांची ओळख असून दीड वर्षांहून अधिक काळ ते रिलेशनशिपमध्ये आहेत. नात्याबद्दल बोलताना आमिर यांनी सांगितले होते की जेव्हा त्यांनी गौरीला ओळखले, तेव्हा त्यांच्यापैकी कुणालाही अपेक्षा नव्हती की हे नाते एवढ्या गंभीर टप्प्यापर्यंत पोहोचेल.
मुलाखतीत दिले संकेत (Amir Khan)
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिर यांनी लिव-इन रिलेशनशिपबाबतही संकेत दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार सध्या ते प्रॉडक्शनमधील ‘हॅपी पटेल’ या चित्रपटाच्या रिलीजच्या धांदलीत आहेत आणि या काळातच त्यांचे आणि गौरीचे एकत्र राहण्याचे निर्णय चर्चेत आले आहेत. ते म्हणाले की त्यांना गौरीबद्दल खूप आदर आणि जवळीक आहे आणि हे नाते पूर्ण प्रामाणिकपणे सांभाळले जात आहे.
मनाने तिच्याशी लग्न केले आहे
गौरीसोबतच्या संभाव्य लग्नाबाबत विचारले असता आमिर यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांनी मनाने तिच्याशी लग्न केले आहे. मात्र हे सर्व औपचारिक पद्धतीने करायचे की नाही, यावर त्यांनी सध्या ठोस उत्तर देण्यास टाळाटाळ केली. त्यांच्या या वक्तव्यामुळेच तिसऱ्या लग्नाच्या चर्चांना आणखी वेग आला आहे. अनेक चाहत्यांना वाटते की दोघेही लवकरच विवाहाची अधिकृत घोषणा करू शकतात.
आमिर खान सध्या अभिनयातून काही काळ दूर असले तरी ते निर्माता म्हणून अधिक सक्रिय झाले आहेत. ते सनी देओलचा ‘लाहोर 1947’ आणि अभिनेत्री साई पल्लवीचा ‘एक दिवस’ या दोन महत्त्वाच्या प्रोजेक्टची निर्मिती करत आहेत. अलीकडेच ते ‘हॅपी पटेल’ या चित्रपटात एका छोट्या भूमिकेत दिसले होते. सध्या इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चा असलेला विषय म्हणजे आमिर आणि गौरीचे नाते. लिव-इन, कमिटमेंट आणि लग्नाविषयीचे आमिरचे उद्गार पाहता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






