Marathi News

अरिजीत सिंगच्या निवृत्तीमागे सलमान खानचा हात?? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Published:
गेल्या काही महिन्यांत सलमान आणि अरिजीतमधील गैरसमज दूर झाल्याची चर्चा होती. सलमानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटासाठी अरिजीतने ‘मातृभूमी’ हे गाणे रेकॉर्डही केले
अरिजीत सिंगच्या निवृत्तीमागे सलमान खानचा हात?? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

गायक अरिजीत सिंहने पार्श्वगायनातून माघार घेण्याची घोषणा करताच संपूर्ण मनोरंजनविश्वात खळबळ उडाली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय गायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरिजीतचा हा निर्णय अचानक समोर येताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. अनेकांनी या निर्णयामागे वैयक्तिक कारणे असतील असे मत व्यक्त केले, तर काहींनी जुन्या वादांना पुन्हा उजाळा देत अभिनेता सलमान खानला जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला.

अरिजीतने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की तो संगीत निर्माण करणे थांबवणार नाही, मात्र चित्रपटांसाठी पार्श्वगायन करणे बंद करणार आहे. त्याने कोणत्याही व्यक्ती किंवा घटनेला दोष न देता हा निर्णय वैयक्तिक असल्याचे लिहिले. मात्र, सोशल मीडियावर विविध मीम्स, प्रतिक्रिया आणि तर्कवितर्कांचा पाऊस पडू लागला. त्यात काहींनी जुना सलमान–अरिजीत वाद पुन्हा पुढे आणत ही निवृत्ती त्याच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला.

कसे आहे सलमान अर्जीतचे नाते

गेल्या काही महिन्यांत सलमान आणि अरिजीतमधील गैरसमज दूर झाल्याची चर्चा होती. सलमानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटासाठी अरिजीतने ‘मातृभूमी’ हे गाणे रेकॉर्डही केले. हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर फक्त काही दिवसांतच अरिजीतची निवृत्तीची पोस्ट आली आणि यावरून सोशल मीडियावर अनेकांनी उपरोधिक मजकूर लिहिण्यास सुरुवात केली. काहींनी “भाईसाठी एक गाणं आणि अरिजीतनं करिअरलाच गुडबाय केलं” अशी खिल्ली उडवली, तर काहींनी “सलमानच्या चित्रपटासाठी गाणं गायल्यानंतरच अरिजीतनं इंडस्ट्रीपासून अंतर घेतलं” अशा कॅप्शन्स पोस्ट केल्या.

दुसरीकडे काही चाहत्यांनी या मीम्सवर नाराजीही व्यक्त केली. अरिजीत हा इंडस्ट्रीतील सर्वात बहुमुखी कलाकार असून त्याचा निर्णय वैयक्तिक आहे, तो कोणत्याही वादाशी जोडणे चुकीचे असल्याचे मत अनेकांनी मांडले. या चर्चेत ‘मातृभूमी’ हे त्याचे अखेरचे चित्रपटगाणे ठरू शकते, अशीही चर्चा रंगू लागली आहे.

चर्चा का सुरू झाल्या

सलमान–अरिजीत वादाची पार्श्वभूमी पाहता अनेकांना हा तर्क सहज वाटला. 2014 च्या एका पुरस्कार सोहळ्यात अरिजीतने “तुम्हीच झोपवलंत” अशी टिप्पणी केल्याने सलमान नाराज झाल्याची चर्चा होती. त्यानंतर सलमानच्या चित्रपटांतून अरिजीतची गाणी काढून टाकण्यात आली. नंतर अरिजीतने सार्वजनिकरीत्या माफी मागितली आणि सलमाननेही ‘बिग बॉस’च्या मंचावर गैरसमज दूर झाल्याचे सांगितले.

हे सर्व असूनही अरिजीतचा निर्णय त्याच्या वैयक्तिक कलात्मक प्रवासाशी संबंधित असण्याची अधिक शक्यता आहे. संगीतकार म्हणून नवीन धाटणीचे प्रयोग, स्वतंत्र म्युझिक प्रोजेक्ट्स आणि लाईव्ह कॉन्सर्ट्सवर लक्ष केंद्रित करण्याचा अरिजीतचा मानस असल्याचे जवळचे सहकारी सांगतात. त्यामुळे त्याच्या निवृत्तीला अनावश्यक राजकीय रंग देणे अनुचित असल्याचे मत इंडस्ट्रीतील अनेकांनी व्यक्त केले आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews