Bollywood News: रणवीर सिंहने ‘कांतारा’मधील दैव सीनची नक्कल केल्यामुळे निर्माण झालेल्या वादावर आता दिग्दर्शक-अभिनेता ऋषभ शेट्टी यांनी मौन सोडले आहे. ‘धुरंधर’च्या रिलीजपूर्वी घडलेल्या या प्रकारावर नाव न घेता प्रतिक्रिया देत ऋषभ शेट्टी यांनी दैव परंपरा ही पवित्र आणि अतिशय संवेदनशील असल्याचे स्पष्ट केले.
काय म्हणाला ऋषभ शेट्टी
एका कार्यक्रमादरम्यान बोलताना ऋषभ शेट्टी म्हणाले की, दैव हे केवळ सिनेमा किंवा परफॉर्मन्सपुरते मर्यादित नसून त्यामागे खोल धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धा आहे. कोणतीही योग्य समज किंवा मार्गदर्शन नसताना या परंपरेची नक्कल केली जाते, तेव्हा ते अस्वस्थ करणारे ठरते. दैवाशी संबंधित भाग हा अत्यंत पवित्र असून त्याची स्टेजवर नक्कल करणे किंवा विनोद करणे टाळावे, अशी विनंती ते जिथे जातात तिथे करतात, असेही त्यांनी सांगितले. Bollywood News
ऋषभ शेट्टींची ही प्रतिक्रिया थेट रणवीर सिंहच्या त्या घटनेशी जोडली जात आहे, ज्यात त्यांनी IFFI मधील एका सत्रात ‘कांतारा’मधील प्रसिद्ध चौंडी सीनची नक्कल केली होती. त्या वेळी रणवीरने डोळे वाकडे करणे, जीभ बाहेर काढणे आणि त्या पात्राला “फीमेल भूत” असे संबोधणे यामुळे वाद निर्माण झाला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
रणवीरने मागितली होती माफी (Bollywood News)
वाद वाढल्यानंतर रणवीर सिंहने सार्वजनिक माफी मागत आपला हेतू चुकीचा नव्हता, असे स्पष्ट केले. ऋषभ शेट्टींच्या अभिनयाचे कौतुक करणे हाच उद्देश असल्याचे सांगत, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून क्षमस्व, असेही त्याने म्हटले होते.
‘कांतारा’मधील चौंडी दैवचा सीन हा चित्रपटातील सर्वात तीव्र, आध्यात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. गुलिगा दैवची रौद्र आणि रक्षण करणारी बहीण म्हणून चौंडीचे चित्रण तुलू आणि भूता कोला परंपरेशी घट्ट जोडलेले आहे. त्यामुळे या दृश्याची खिल्ली उडवली जाणे अनेक प्रेक्षकांना अपमानास्पद वाटते. ऋषभ शेट्टींच्या या स्पष्ट भूमिकेमुळे दैव परंपरेबाबत संवेदनशीलता राखण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, सिनेसृष्टीतील कलाकारांनी सांस्कृतिक विषय हाताळताना अधिक जबाबदारीने वागावे, असा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी दिला आहे.





