Border 2 च्या ट्रेलरमधील संवादावरून वाद; सनी देओलच्या एका वाक्याने सोशल मीडियावर तापले वातावरण

Published:
ट्रेलरमध्ये सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकत आहेत. तिन्ही सैन्यदलांना समर्पित अशी कथानकाची मांडणी असल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट दिसते
Border 2 च्या ट्रेलरमधील संवादावरून वाद; सनी देओलच्या एका वाक्याने सोशल मीडियावर तापले वातावरण

Border 2 : सनी देओलचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बॉर्डर 2’ गुरुवारी ट्रेलरसह प्रेक्षकांसमोर आला आणि काही तासांतच हा व्हिडिओ सर्व प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला. 1997 मधील ‘बॉर्डर’ने भारतीय सिनेमात देशभक्तीचा एक नवा मापदंड उभा केला होता. त्या चित्रपटाची दणदणीत छाप अजूनही प्रेक्षकांच्या मनावर आहे. अशा ऐतिहासिक चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र ट्रेलरचे कौतुक जितके झाले, तितकाच एका संवादामुळे निर्माण झालेला वादही चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

काय आहे ट्रेलर मध्ये ( Border 2)

ट्रेलरमध्ये सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकत आहेत. तिन्ही सैन्यदलांना समर्पित अशी कथानकाची मांडणी असल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट दिसते. दमदार संवाद, वेगवान अॅक्शन आणि राष्ट्रभावनेने ओतप्रोत असलेले अनेक प्रसंग पाहून जुना ‘बॉर्डर’चा अनुभव पुन्हा डोळ्यासमोर उभा राहतो. परंतु इतक्यातच एका संवादाने प्रेक्षकांमध्ये मतभेद निर्माण केले आहेत.

त्या सीन मध्ये नेमकं काय

वाद निर्माण करणारा संवाद ट्रेलरमधील एका दृश्यात सनी देओलने म्हटलेला आहे. तो म्हणतो, “तुमच्या पाकिस्तानमध्ये इतके लोक नाहीत, जितके आमच्याकडे ईदला बकरे कापले जातात.” हे वाक्य ऐकताच अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हा संवाद अनुचित असल्याचे सांगत ट्रोलिंगला सुरुवात केली. काहींच्या मते, हे विधान एका धार्मिक सणाचा उल्लेख असल्यामुळे त्याचा चुकीच्या अर्थाने वापर झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे हा संवाद वादग्रस्त ठरू शकतो अशी चिंता व्यक्त करण्यात आली.

दुसऱ्या बाजूला, सनी देओलचे चाहते मात्र या वाक्याचे समर्थन करताना दिसले. त्यांच्या मते, सनी देओलचे संवाद हे नेहमीच ऊर्जावान, आक्रमक आणि देशभक्तीची भावना जागृत करणारे असतात. काही युजर्स म्हणाले की अभिनेता वयाने मोठा झाला असला तरी त्याची दमदार स्क्रीन प्रेझेन्स आणि दणकट आवाज अजूनही तितकाच प्रभावी आहे. सोशल मीडियावर त्याच्या या डायलॉगला पाठिंबा दर्शवणाऱ्या टिप्पण्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत.

ट्रेलरच्या रिलीजसोबतच चित्रपटाबद्दलचा उत्साह बाजारातही दिसू लागला आहे. ट्रेड विश्लेषकांच्या मते, ‘बॉर्डर 2’ हा 2026 मधील मोठ्या चित्रपटांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांचे मत आहे की या चित्रपटाला 50 कोटी रुपयांपर्यंतची मोठी ओपनिंग मिळू शकते. मूळ ‘बॉर्डर’च्या लोकप्रियतेमुळे आणि आता नव्या पिढीतील कलाकारांच्या सहभागामुळे हा सिक्वेल अधिकच प्रभावी ठरू शकतो, अशी अपेक्षा आहे. चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. वादग्रस्त संवादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया असणार, हा सगळ्यांच्या नजरेतला मुद्दा ठरणार आहे. ट्रेलरनंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिक वाढली असून, वाद असूनही ‘बॉर्डर 2’ची हवा आधीच जोरात वाहताना दिसत आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews