Wed, Dec 31, 2025

Marathi Movie Uttar : उत्तर’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचल्या आजीबाई; स्क्रिनिंगदरम्यानचा भावूक व्हिडिओ व्हायरल

Published:
दिग्दर्शक आणि लेखक क्षितीज पटवर्धन यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. कोल्हापूरमध्ये झालेल्या ‘उत्तर’च्या स्क्रिनिंगदरम्यानचा हा क्षण पाहणाऱ्यांच्या मनाला भिडणारा आहे
Marathi Movie Uttar : उत्तर’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचल्या आजीबाई; स्क्रिनिंगदरम्यानचा भावूक  व्हिडिओ व्हायरल

Marathi Movie Uttar : मराठी चित्रपटसृष्टीत नुकताच प्रदर्शित झालेला ‘उत्तर’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. दमदार कथा, नात्यांची कोमल गुंफण आणि हृदयाला भिडणारा सिने अनुभव यामुळे या चित्रपटाने मोठ्या बॉलिवूड-हॉलिवूड रिलीजच्या गर्दीतही स्वतःचा ठसा उमटवला आहे. मायलेकाच्या नात्यावर आधारित असलेल्या ‘उत्तर’ला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असताना, आता या चित्रपटाशी संबंधित एक भावूक करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

आज्जीबाईंचा भावुक व्हिडिओ

दिग्दर्शक आणि लेखक क्षितीज पटवर्धन यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. कोल्हापूरमध्ये झालेल्या ‘उत्तर’च्या स्क्रिनिंगदरम्यानचा हा क्षण पाहणाऱ्यांच्या मनाला भिडणारा आहे. व्हिडिओमध्ये एक आजीबाई वाकून, अक्षरशः पावलोपावली आधार घेत चालताना दिसतात. चालणेही कठीण झालेल्या त्या आजीबाई चित्रपट पाहण्यासाठी स्वतः थिएटरमध्ये पोहोचल्या होत्या. त्यांचा उत्साह पाहून सभोवतालचे सर्वजण थक्क झाले.

क्षितीज पटवर्धन यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे, “उत्तर ने काय दिलं, या प्रश्नाचं उत्तर हाच व्हिडीओ आहे. कोल्हापूरमधून आकाशने पाठवलं. मी या प्रेमापुढे नतमस्तक आहे.” या एका व्हिडिओतून प्रेक्षकांनी ‘उत्तर’ या चित्रपटाला दिलेलं मनापासूनचं प्रेम दिसून येतं.

उत्तरमध्ये कोणकोणाची भूमिका

‘उत्तर’मध्ये रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे आणि हृता दुर्गुळे यांच्या प्रमुख भूमिका असून, निर्मिती सावंत विशेष भूमिकेत दिसते. कथानक, अभिनय आणि दिग्दर्शनाच्या साधेपणातही भावूक करणारी ताकद असल्याचं प्रेक्षक सांगत आहेत.

क्षितीज पटवर्धन यांनी ‘उत्तर’मधून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं असून, 12 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी शोज हाऊसफुल होत असल्याची माहिती निर्मात्यांकडून देण्यात येत आहे. चालताही अवघड होऊनही सिनेमा अनुभवण्यासाठी थिएटरमध्ये आलेल्या त्या आजीबाईंचा व्हिडिओ ‘उत्तर’ची प्रभावीता आणि मराठी प्रेक्षकांचं सिनेमाप्रती असलेलं अपार प्रेम किती मोठं आहे याची जाणीव करून देतो.