Mardaani 3 Trailer Released : राणी मुखर्जी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दमदार पद्धतीने पुनरागमन करत असून तिचा आगामी चित्रपट ‘मर्दानी 3’ सध्या चर्चेत आहे. यशराज फिल्म्सने प्रदर्शित केलेला ट्रेलर चाहत्यांसाठी खास ठरला आहे. राणीच्या तीस वर्षांच्या अभिनय प्रवासाच्या निमित्ताने आलेल्या या ट्रेलरने प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत.
राणी मुखर्जी पोलिसांच्या भूमिकेत (Mardaani 3 Trailer Released)
या चित्रपटात राणी मुखर्जी पुन्हा एकदा कर्तव्यनिष्ठ, धाडसी आणि कठोर पोलिस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसते. देशभरातील अनेक तरुण मुली अचानक बेपत्ता होत असताना शिवानीला या गुन्हेगारी प्रकरणांमागील खऱ्या सूत्रधाराचा शोध घ्यावा लागतो. पण यावेळी तिच्यासमोर उभा ठाकतो एक वेगळाच आणि अनपेक्षित विरोधक—अम्मा. पुरुष विरोधकांपेक्षा अधिक धोकादायक, विचारपूर्वक कारवाई करणारी आणि पूर्णपणे निर्दयी अशी ही महिला विलन प्रेक्षकांच्या विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. Mardaani 3 Trailer Released
अम्माच्या भूमिकेत कोण?
अम्माच्या भूमिकेत अभिनेत्री मल्लिका प्रसाद दिसणार असून त्यांच्या अभिनयाने ट्रेलरमध्येच प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. थंड नजरा, शांत पण प्रखर व्यक्तिमत्व आणि गुन्हेगारी साम्राज्यावरची त्यांची पकड पाहून सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल जिज्ञासा वाढली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर मल्लिका प्रसाद या नावाचा शोध मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसले. अनेक प्रेक्षक त्यांना मर्दानी मालिकेत आत्तापर्यंतच्या सर्वात धोकादायक विरोधकांपैकी एक मानत आहेत.
मल्लिका प्रसाद यांनी थिएटर, टेलिव्हिजन आणि सिनेमामध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून त्यांनी अभिनयाचे शिक्षण घेतले असून लंडनच्या गोल्डस्मिथ्स कॉलेजमधून परफॉर्मन्स मेकिंगमध्ये मास्टर्स केले आहे. त्यांचा सोलो थिएटर प्ले ‘हिडन इन प्लेन साइट’ आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित झाला आहे. अलीकडील काही वर्षांत त्या अनुराग कश्यप यांच्या ‘ऑलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ आणि ओटीटीवरील सिरीज ‘किलर सूप’मध्येही दिसल्या आहेत.
अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे. त्यांच्या कारकिर्दीत ‘कानूनू हेगगदिती’, ‘देवी अहिल्या बाई’ आणि ‘दूसरा’ यांसारखे चित्रपट, तसेच ‘गरवा’, ‘गुप्तगामिनी’ आणि ‘मेघा-मयूरी’सारख्या मालिकांचा समावेश आहे.
मल्लिका प्रसाद या नेहमीच करिअरमधील अनिश्चिततेला स्वीकारून काम करणाऱ्या कलाकारांपैकी आहेत. त्यांनी एका पोस्टमध्ये “कल क्या होगा, कौन जानता है” असे लिहिले होते. नव्या आव्हानांना सामोरे जाण्याची त्यांची तयारी आणि अभिनयातील विविधतेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अम्माच्या भूमिकेशी पूर्णपणे जुळून येतो. हीच धाडसी वृत्ती त्यांच्या ‘मर्दानी 3’ मधील भूमिकेला अधिक प्रभावी बनवते.
ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादावरून ‘मर्दानी 3’ हा भाग अधिक तीव्र, अधिक वास्तववादी आणि अधिक भावनिक पातळीवर परिणाम करणारा ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. राणी मुखर्जीच्या दमदार अभिनयासोबतच मल्लिका प्रसादचा भेदक विरोधक हा चित्रपटाचा मुख्य आकर्षण ठरत आहे.





