शाहिद कपूरचा आगामी चित्रपट ‘ओ रोमियो’ सध्या प्रेक्षकांच्या तीव्र उत्सुकतेचा विषय ठरला आहे. 2026 मधील सर्वात मोठ्या रिलीजपैकी एक मानल्या जाणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केले असून शाहिदसोबत तृप्ती डिमरी, विक्रांत मॅसी, तमन्ना भाटिया, दिशा पटानी आणि नाना पाटेकर यांसारखे दमदार कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. पुढील महिन्यात थिएटर्समध्ये दाखल होणाऱ्या या चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आणि त्यानंतर चित्रपटाबद्दलची चर्चा अधिकच रंगू लागली.
टीझर आधीच प्रदर्शित झाला
9 जानेवारी रोजी शाहिदचा तीव्र, धोकादायक आणि बिनधास्त लूक असलेला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर आलेल्या 1 मिनिट 35 सेकंदांच्या टीजरमध्ये शाहिदचा हिंस्र आणि रोमॅंटिक या दोन्ही छटा असलेला गँगस्टर अवतार दिसून आला. टीजरमध्ये दाखवलेली त्यांची बॉडी लँग्वेज, चेहऱ्यावरील क्रूर भाव आणि अॅक्शन सीन्स पाहून चाहत्यांनी हा चित्रपट ‘विशाल भारद्वाज स्टाइल’च्या गँगस्टर ड्रामामध्ये गणला आहे.
तृप्तीच्या भूमिकेवर चर्चा
फिल्मच्या टीजरनंतर सर्वाधिक चर्चा होत आहे ती तृप्ती डिमरीच्या भूमिकेबद्दल. इंडस्ट्रीत ही चर्चा अधिक वाढली आहे की तृप्तीचा रोल मुंबईच्या कुख्यात महिला गँगस्टर ‘सपना दीदी’ अर्थात अशरफ खान यांच्या जीवनावर आधारित असू शकतो. तर शाहिदचा लूकही गँगस्टर हुसैन उस्तरा या नावाशी साधर्म्य दाखवत असल्याची चर्चा आहे. अधिकृत पुष्टी नसली तरी चित्रपटातील टोन आणि पात्रांची शैली पाहता ही प्रेरणा घेतल्याची शक्यता प्रेक्षक मांडत आहेत.
सपना दीदी कोण होत्या, याबद्दल अनेकांना फारशी माहिती नाही. अशरफ खान ऊर्फ सपना दीदी या मुंबईतील सर्वात निर्भय महिला गँगस्टर्सपैकी एक मानल्या जात. त्यांची दाऊद इब्राहिमशी उघड दुश्मनी होती. त्यांच्या वैराग्यामागे एक मोठा व्यक्तिगत आघात दडलेला होता. त्यांच्या पती महमूद खान यांनी दाऊदच्या गँगसाठी एक काम करण्यास नकार दिल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. या दुखद घटनेने साध्या स्वभावाची अशरफ एका भयानक सूडभावनेने पेटून उठली आणि तिने थेट अंडरवर्ल्डच्या रणांगणात पाऊल टाकले.
आपल्या पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सपना दीदी यांनी गँगस्टर हुसैन उस्तऱ्याचा गट जॉइन केला. त्यांनी त्यांच्याकडून शस्त्रबळ, रणनीती आणि लढाईचे तंत्र शिकले. तिच्या या परिवर्तनाची कहाणी अत्यंत नाट्यमय होती. एका घरगुती महिलेपासून एका बिनधास्त, निर्भय आणि धाडसी महिला गँगस्टरपर्यंतचा तिचा प्रवास अंडरवर्ल्डच्या इतिहासात वेगळे स्थान निर्माण करतो. तिने हुसैन उस्तऱ्यासह दाऊद इब्राहिमवर अनेकदा हल्ले केले आणि त्याच्या अवैध नेटवर्कला लक्ष्य केले. दाऊदच्या सामर्थ्याला टक्कर देण्याचे धाडस करणाऱ्या थोड्याच लोकांमध्ये तिचे नाव घेतले जाते.
सपना दीदीने एकदा शारजाहमध्ये चालू असलेल्या क्रिकेट सामन्यात दाऊदवर हल्ला करण्याची योजना आखली होती. मात्र तिची योजना उधळली गेली. 1994 साली, आपला सूड पूर्ण करण्यापूर्वीच तिचा शेवट झाला. दाऊदच्या माणसांनी तिच्यावर अत्यंत क्रूर पद्धतीने हल्ला केला. ई-टाइम्सच्या माहितीनुसार, मुंबईतील तिच्या घरावर तब्बल 22 वेळा हल्ला करण्यात आला होता आणि त्या वेळी तिच्या शेजाऱ्यांनीसुद्धा मदत करण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली होती.
‘ओ रोमियो’ हा चित्रपट खरोखर हुसैन उस्तरा आणि सपना दीदी यांच्या कथांवर आधारित आहे का, या प्रश्नाचं अद्याप अधिकृत उत्तर नाही. चित्रपटाचे निर्माते किंवा दिग्दर्शक यांनी कोणतीही पुष्टी दिलेली नाही. मात्र पात्रांच्या शैलीतील साम्य, कथानकाचा टोन आणि टीजरमधील हिंसक आणि भावनिक लेअर्स पाहता प्रेक्षकांना ही कथा त्यांच्या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर उभी असल्याची जाणीव होत आहे.
साजिद नाडियाडवाला निर्मित ‘ओ रोमियो’ 13 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांसाठी हा आणखी एक अंडरवर्ल्ड ड्रामा ठरेल की काहीतरी वेगळे पाहायला मिळेल, हे मोठ्या पडद्यावरच स्पष्ट होणार आहे.





