Prathamesh Kadam Death : प्रथमेश कदमच्या निधनाने मराठी सोशल मिडीयावर शोककळा; लोकप्रिय रील स्टारची मृत्यूशी झुंज अपयशी

Published:
प्रथमेशच्या अचानक जाण्याने त्याचे फॉलोअर्स, चाहत्यांसह मराठी डिजिटल क्षेत्रातील क्रिएटर्समध्ये मोठी हळहळ आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या या तरुणाने आपल्या रील्समधून लाखो लोकांपर्यंत पोहोचत लोकप्रियता मिळवली होती.
Prathamesh Kadam Death : प्रथमेश कदमच्या निधनाने मराठी सोशल मिडीयावर शोककळा; लोकप्रिय रील स्टारची मृत्यूशी झुंज अपयशी

Prathamesh Kadam Death : मराठी सोशल मीडियावर आपल्या निरागसतेने, सहजतेने आणि मनमिळाऊ स्वभावाने चाहत्यांची मने जिंकणारा रील स्टार प्रथमेश कदम याचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो प्रकृतीच्या समस्यांनी त्रस्त होता. अखेर आजाराशी सुरू असलेली त्याची झुंज थांबली असून त्याचे मित्र आणि जवळचे सहकारी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती सर्वांसमोर आणली.

प्रथमेशच्या अचानक जाण्याने त्याचे फॉलोअर्स, चाहत्यांसह मराठी डिजिटल क्षेत्रातील क्रिएटर्समध्ये मोठी हळहळ आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या या तरुणाने आपल्या रील्समधून लाखो लोकांपर्यंत पोहोचत लोकप्रियता मिळवली होती.

आईसोबतची जुळलेली मायलेकाची जोडगोळी

सोशल मीडियावर प्रथमेश आणि त्याची आई प्रज्ञा कदम यांच्या जोडीनं केलेले रील्स प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यांच्या दोघांतील साधेपणा, प्रेमळ नातं आणि नैसर्गिक अभिनयामुळे प्रत्येक व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचायचा. चाहत्यांसाठी ही जोडी म्हणजे भावनांचा, हसण्याचा आणि कौटुंबिक ऊब अनुभवण्याचा एक छोटा सुंदर क्षण होता. आधी पती आणि आता मुलगा गमावल्याने प्रज्ञा कदम यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर असताना प्रथमेशने आईला सतत आधार दिला होता आणि हेच नाते त्यांच्या रील्समधूनही प्रतिबिंबित व्हायचे. Prathamesh Kadam Death

आजारीपणातही कायम हास्य पसरवणारा  चेहरा

डिसेंबर 2025 मध्ये प्रथमेशने एका व्हिडिओद्वारे आपल्या आजारपणाचा आणि काही व्यक्तींनी केलेल्या फसवणुकीचा उल्लेख केला होता. त्यावेळीही त्याने निराश न होता चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे थांबवले नाही. हॉस्पिटलमधील बेडवरूनही त्याने कंटेंट बनवत लोकांचं मनोरंजन केलं. नववर्षानिमित्त त्याचे एक नवीन गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यालाच त्याचा शेवटचा व्हिडिओ म्हणून आठवले जाईल.

नेटकऱ्यांच्या भावना; ‘अजूनही विश्वास बसत नाही…

या तरुण क्रिएटरच्या अचानक जाण्याने नेटकऱ्यांमध्ये अविश्वास आणि दुःखाचं वातावरण आहे. इंस्टाग्रामवरील त्याच्या शेवटच्या व्हिडिओवर आजही कमेंट्सचा ओघ सुरूच आहे. चाहत्यांनी त्याच्या आठवणी, त्याचे विनोदी व्हिडिओ आणि आईसोबतचे भावनिक क्षण शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.