Raja Shivaji Movie : अखेर शेकडो तासांच्या शूटिंगला पूर्णविराम मिळाल्यानंतर रितेश देशमुखने आपल्या ड्रीम प्रोजेक्ट ‘राजा शिवाजी’चा मोठा अपडेट दिला आहे. तब्बल १०० दिवस सुरू असलेले शूटिंग नुकतेच संपले असून पोस्ट-प्रॉडक्शनला वेग आला आहे. रितेश आणि जिनिलिया या दोघांसाठी हा चित्रपट भावनिक स्वप्नासारखा असल्याचे जवळपास सर्वच मुलाखतींमध्ये ऐकायला मिळाले होते.
मध्यंतरी रितेशचा शिवरायांच्या पोशाखातील लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. दाढी, मिशी, वेगळी वेषभूषा आणि भक्कम देहयष्टी पाहून प्रेक्षकांत कुतूहल निर्माण झाले. त्यातच संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, अमोल गुप्ते यांच्यासारखे कलाकार झळकणार असल्याच्या चर्चांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढत होती.
विद्या बालन ची एंट्री
परंतु आता रितेशने टाकलेल्या एका पोस्टने ही उत्सुकता आणखी वाढवली आहे. शूटिंग पूर्ण झाल्याची घोषणा करताना त्याने कलाकारांच्या नावांसोबत आणखी एका सशक्त अभिनेत्रीला टॅग केले आहे – विद्या बालन. तिचा चित्रपटात कोणता रोल असेल, हे अद्याप जाहीर नसले तरी सोशल मीडियावर तिच्या एंट्रीची चर्चा रंगू लागली आहे. हे नाव जोडल्याने चित्रपटाचा कॅन्व्हास आणखी विस्तारला आहे असे म्हणता येईल. Raja Shivaji Movie
रितेशने पोस्टमध्ये व्यक्त केलेली भावना लक्ष वेधून घेते. त्याने लिहिले की,
क्षणभर थांबलेला सूर्य,
मावळतीचा मावळ,
पण क्षणभरासाठीच,
उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी…
या शब्दांतून त्याने मेहनतीचा प्रवास, निष्ठा आणि समर्पण व्यक्त केले. १०० दिवसांची कष्टप्रद वाटचाल, असंख्य आठवणी आणि असंख्य भावना मनात साठवत रितेश आता प्रेक्षकांसमोर शिवरायांची शौर्यगाथा उभी करण्यास सज्ज आहे.
कधी प्रदर्शित होणार? Raja Shivaji Movie
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी, महाराष्ट्र दिनाच्या विशेष दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे. संगीत क्षेत्रात भक्कम ओळख असलेल्या अजय-अतुल या चित्रपटाला संगीत देणार आहेत. रितेशने दिग्दर्शन, अभिनय, आणि निर्मिती या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला झोकून दिल्याने हा चित्रपट त्याच्यासाठी केवळ करिअरमधील आणखी एक प्रोजेक्ट नाही तर भावनिक प्रवास असल्याचं दिसून येत आहे.
आता प्रेक्षकांची नजर एका प्रतीक्षित क्षणावर आहे – राजा शिवाजीचा टीझर आणि ट्रेलर कधी समोर येणार? विद्या बालनची नेमकी भूमिका काय असणार? आणखी कोणते ऐतिहासिक संदर्भ उलगडणार? या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता उफाळून आली आहे. या भव्य सिनेमाद्वारे शिवछत्रपतींच्या इतिहासावर पुन्हा प्रकाशझोत पडणार आणि मराठी चित्रपट उद्योगासाठी मोठी पायरी ठरण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.





