बॉलिवूडमधील सेलिब्रिटींना लक्ष्य करण्याच्या घटना वाढत असल्याची गंभीर नोंद सुरक्षा यंत्रणांनी घेतली आहे. सलमान खान, कपिल शर्मा यांच्यानंतर आता दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारामुळे फिल्म इंडस्ट्रीत चिंता वाढली आहे. या प्रकरणाचा तपास आता मुंबई क्राइम ब्राँचकडे असून सुरुवातीच्या चौकशीत अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळत आहेत.
क्राइम ब्राँचच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचा फरार गुर्गा शुभम लोनकर हा या गोळीबाराचा मुख्य सूत्रधार असल्याची शक्यता अधिक बळावली आहे. पोलिसांनी मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शुभम लोनकरनेच या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे समजते. तसेच फायरिंग करणाऱ्या सुट्या शूटरांना शस्त्रे आणि लॉजिस्टिक मदत पुरवण्यात त्याचीच भूमिका असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
शुभम लोनकर याचे नाव यापूर्वीही गुन्हेगारी प्रकरणांत समोर आले आहे. एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या तपासातही त्याचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. सध्या तो पोलिसांच्या हाती लागलेला नसून त्याला पकडण्यासाठी विशेष मोहिम राबवली जात आहे.
घटना कशी घडली?
जुहू येथील रोहित शेट्टी यांच्या नऊ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. एका गोळीचा तुकडा इमारतीतील जिमच्या काचेवर आदळला. सुदैवाने त्या वेळी कोणीही परिसरात नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. प्रारंभी तपास मुंबई पोलिसांकडे होता, मात्र घटनेची गंभीरता लक्षात घेऊन तो क्राइम ब्राँचकडे वर्ग करण्यात आला.
क्राइम ब्राँचने हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी 12 वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपींची हालचाल स्पष्ट दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्या आधारे त्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
रोहित शेट्टीने वाढवली सावधगिरी
घटनेनंतर रोहित शेट्टी पूर्णपणे पोलिस सहकार्यात आहेत. क्राइम ब्राँचने त्यांचा तपशीलवार जबाब नोंदवला असून त्यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच त्यांनी आपल्या जवळच्या लोकांना काही दिवस घरात न येण्याचा सल्ला दिल्याचे त्यांच्या मित्रपरिवारातून समजते.
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. लॉरेन्स बिश्नोई गँग बॉलिवूडला सातत्याने लक्ष्य करत असल्याने सुरक्षा यंत्रणांसमोर नवीन आव्हान निर्माण झाले आहे.






