Shreyas Talpade : मराठी प्रेक्षकांत प्रचंड लोकप्रिय असलेला ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सुरू होण्याची उलटी गिनती लागली आहे. स्पर्धकांच्या नावांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच बॉलिवूड आणि मराठी मनोरंजनविश्वातील आवडता अभिनेता श्रेयस तळपदेचे नाव चर्चेत आल्यानं चाहत्यांमध्ये खळबळ माजली. सोशल मीडियावर श्रेयस घरात स्पर्धक म्हणून प्रवेश करणार, अशा बातम्या तुफान व्हायरल झाल्या. मात्र या चर्चांचा शेवट स्वतः श्रेयसनेच केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन माध्यमांमध्ये श्रेयसने ‘बिग बॉस मराठी ६’मध्ये सहभागी होण्यास होकार दिल्याची माहिती फिरत होती. यामागे कारणही ठोस मानले जात होते—यंदाच्या सीझनचं सूत्रसंचालन करणारा अभिनेता रितेश देशमुख आणि श्रेयस तळपदे हे दोघे खास मित्र. त्यामुळे त्याची एन्ट्री शोमध्ये मोठं आकर्षण ठरेल, असा अंदाज वर्तवला जात होता.
श्रेयस म्हणतो निव्वळ अफवा
परंतु या सर्व तर्क-वितर्कांवर श्रेयसने झूमला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट प्रतिक्रिया नोंदवली. त्याने सांगितले की, काहीही आधार नसताना अशा अफवा पसरवण्याचे प्रमाण खूप वाढले असून या गोष्टींकडे गंभीरतेने पाहण्याची गरज नाही. अभिनेता म्हणाला, “या निव्वळ अफवा आहेत. कृपया याकडे दुर्लक्ष करा. आजकाल कोणतीही गोष्ट ट्रेंड करण्यासाठी कलाकारांना सहज टार्गेट केलं जातं.” श्रेयसने दिलेला हा निर्वाळा पाहता त्याच्या शोमध्ये येण्याविषयीची उत्सुकता संपुष्टात आली आहे.
रितेश देशमुखच्या सूत्रसंचालनामुळे या सीझनबद्दल प्रेक्षकांमध्ये वेगळंच औत्सुक्य निर्माण झाले आहे. रितेश आणि श्रेयस यांनी ‘हाऊसफुल्ल’सह अनेक प्रकल्पांमध्ये एकत्र काम केले असल्याने ते दोघे बिग बॉसच्या घरात दिसले असते तर प्रेक्षकांना हलकंफुलकं मनोरंजन आणि मैत्रीची जुगलबंदी पाहायला मिळाली असती. पण यंदा तरी हा ‘भाऊचा धक्का’ मिळणार नाही, हे निश्चित झाले आहे. Shreyas Talpade
कधी सुरू होणार
‘बिग बॉस मराठी ६’चा ग्रँड प्रीमियर ११ जानेवारी २०२६ ला होणार असून निर्मात्यांनी यंदाच्या सीझनमध्ये काही मोठी नावं आणि अनपेक्षित वळणं पाहायला मिळतील, असा दावा केला आहे. श्रेयस मात्र सध्या आपल्या आगामी सिनेमे आणि नाट्यप्रकल्पांमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे त्याच्या घरात एन्ट्रीची शक्यता तशी धूसरच राहिली आहे.





