MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

Sohail Khan : हेल्मेटशिवाय महागडी बाइक चालवणं पडलं महागात! सोहेल खानने मागितली जाहीर माफी

Published:
पुढे अशा प्रकारची चूक होऊ नये यासाठी तो नियमांचे पालन करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, असे आश्वासनही त्याने दिले
Sohail Khan : हेल्मेटशिवाय महागडी बाइक चालवणं पडलं महागात! सोहेल खानने मागितली जाहीर माफी

Sohail Khan : हेल्मेटशिवाय महागडी बाइक चालवल्यामुळे अभिनेता सोहेल खान सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता-निर्माता म्हणून ओळख असलेला सोहेल खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये तो मुंबईतील वांद्रे परिसरात सुमारे 17 लाख रुपयांची आलिशान बाइक हेल्मेट न घालता चालवत असल्याचे दिसत होते. व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका करत वाहतूक नियम पाळण्याचा सल्ला दिला.

नियम तोडणे चुकीचेच : Sohail Khan 

सोशल मीडियावर वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अखेर सोहेल खानने स्वतः पुढे येत स्पष्टीकरण दिले आणि जाहीर माफी मागितली. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक सविस्तर निवेदन शेअर करत आपण केलेली चूक मान्य केली. हेल्मेट न घालण्यामागचे कारण सांगताना त्याने आपल्याला क्लॉस्ट्रोफोबियाचा त्रास असल्याचे सांगितले. हेल्मेट घातल्यावर घुसमट आणि अस्वस्थता जाणवते, त्यामुळे कधी कधी तो हेल्मेट टाळतो, असे त्याने स्पष्ट केले. मात्र हे कोणतेही समर्थन नसून नियम तोडणे चुकीचेच आहे, असेही त्याने ठामपणे नमूद केले.

लहानपणा पासून रायडिंग ची आवड

सोहेल खानने आपल्या पोस्टमध्ये इतर दुचाकीस्वारांनाही उद्देशून महत्त्वाचा संदेश दिला. प्रत्येक रायडरने सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य द्यावे आणि नेहमी हेल्मेट घालावे, असे त्याने आवर्जून सांगितले. लहानपणापासूनच रायडिंगची आवड असल्याचे सांगत त्याने BMX सायकलपासून आपल्या प्रवासाची सुरुवात झाली होती, असेही नमूद केले. सध्या तो प्रामुख्याने उशिरा रात्री कमी ट्रॅफिक असताना बाइक चालवतो, जेणेकरून धोका कमी राहील. तसेच तो कमी वेगातच राइड करतो आणि सुरक्षेसाठी मागे त्याची कारही चालत असल्याची माहिती त्याने दिली.

आपली भूमिका पुढे मांडताना सोहेल खानने सहकारी रायडर्स आणि वाहतूक पोलिसांची मनापासून माफी मागितली. पुढे अशा प्रकारची चूक होऊ नये यासाठी तो नियमांचे पालन करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, असे आश्वासनही त्याने दिले. क्लॉस्ट्रोफोबियावर मात करून नियमितपणे हेल्मेट घालण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्याने सांगितले. सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा आधीच काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे, असे मत व्यक्त करत त्याने सर्व दुचाकीस्वारांना सावध राहण्याचा सल्ला दिला.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर सोहेल खानने 1998 मध्ये फॅशन डिझायनर सीमा सजदेहशी लग्न केले होते. जवळपास 24 वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि 2022 मध्ये त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला. त्यांच्या निर्वाण आणि योहान या दोन मुलांचे संगोपन ते दोघे मिळून करत आहेत. व्यावसायिक कारकीर्दीत सोहेल खानने अभिनेता तसेच निर्माता म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे. सलमान खान आणि अरबाज खानचा धाकटा भाऊ असलेला सोहेल आपल्या सोहेल खान प्रोडक्शन्स या बॅनरखाली चित्रपट निर्मितीतही सक्रिय आहे. अभिनय, निर्मिती आणि वैयक्तिक आयुष्य यांमधील घडामोडींमुळे तो नेहमीच चर्चेत असतो, आणि यावेळीही वाहतूक नियमांच्या मुद्द्यावरून तो पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.