Sunil Grover As Amir Khan : बॉलीवूडमध्ये उत्कृष्ट मिमिक्री आर्टिस्ट म्हटले की पहिल्या रांगेत नाव येते ते सुनील ग्रोवरचे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या ताज्या एपिसोडने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे. सुनीलने या भागात आमिर खानची अशी नक्कल सादर केली की स्टुडिओतील प्रेक्षकांसोबतच स्वतः आमिर खानदेखील थक्क झाले. व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर आता आमिर खानने दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
सुनीलच्या एक्टने आमिर प्रभावित (Sunil Grover As Amir Khan)
या एपिसोडमध्ये कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे आपल्या आगामी ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. त्यांच्यासमोर सुनील ग्रोवरने आमिर खानचा लुक, हावभाव आणि बोलण्याची शैली इतक्या नेमकेपणाने सादर केली की कार्यक्रमातील लोक टाळ्या थांबवू शकले नाहीत. हे दृश्य ऑनएअर होताच सोशल मीडियावर मीम्स आणि क्लिप्सचा पाऊस पडू लागला.
या सादरीकरणावर प्रतिक्रिया देताना आमिर खान यांनी ‘बॉलीवूड हंगामा’शी बोलताना म्हटले, “मी याला मिमिक्री म्हणणार नाही. हे इतकं वास्तव वाटलं की क्षणभर मला असं जाणवलं, मीच का स्वतःला पाहतो आहे? मला फक्त एक छोटी क्लिप पाहायला मिळाली होती, पण आता पूर्ण एपिसोड पाहणार आहे. जेवढं पाहिलं तेवढं प्राइसलेस होतं. मी इतका हसलो की श्वासही निघेनासे झाले! आमिरने पुढे स्पष्ट केले की या एक्टमध्ये कुठलाही गैरसमज किंवा वाईट हेतू नव्हता. “हे फक्त मजेसाठी होतं आणि त्यात मला खूप आनंद मिळाला. कदाचित मीच सर्वात जास्त हसत होतो,” असे ते म्हणाले. Sunil Grover As Amir Khan
सुनीलचा ‘आमिर अवतार’ ठरला मुख्य आकर्षण
शोमध्ये सुनील ग्रोवरने केवळ आमिर खानचा लुकच नव्हे तर त्यांची खास बोलण्याची पद्धत, हातवारे आणि संवादातील थांबे यांचीही अप्रतिम नक्कल केली. तो स्टेजवर येताच प्रेक्षकांनी हशा आणि टाळ्यांचा वर्षाव केला. कार्तिक आणि अनन्या दोघेही काही क्षण अवाक झालेले दिसले. सोशल मीडियावर या क्लिप्सला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळत आहेत. अनेकांनी कमेंट करून सुनीलला ‘बॉलीवूडचा सर्वश्रेष्ठ कॉमिक परफॉर्मर’ म्हटले आहे.
शोची स्टार-स्टडेड टीम कायम चर्चेत
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा हा सीझन प्रियंका चोप्राच्या ग्रँड एपिसोडने सुरू झाला होता. या सीझनमध्ये कपिल शर्मा, सुनील ग्रोवर, कृष्णा अभिषेक, नवजोत सिंह सिद्धू आणि अर्चना पूरन सिंह एकत्र दिसत आहेत. प्रेक्षकांना आठवलेली ‘कपिल–सुनील’ जोडी पुन्हा एकदा जमली असून त्यांच्या केमिस्ट्रीमुळे शोचे TRP सातत्याने वाढताना दिसत आहे.






