Toxic : कन्नड सुपरस्टार यश, नयनतारा आणि कियारा आडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. आता या चित्रपटातून कियारा आडवाणीचा पहिला लुक समोर आला असून त्याने सोशल मीडियावर खूपच चर्चा रंगवली आहे. कियारा आडवाणीचा हा पोस्टर स्वतः यशने इंस्टाग्रामवर शेअर केला.
काय आहे पोस्टर मध्ये
जारी केलेल्या पोस्टरमध्ये कियारा एका फॅशन रॅम्पवर वॉक करताना दिसते. ऑफ-शोल्डर, हाय-स्लिट गाऊनमध्ये तिचा ग्लॅमरस आणि कॉन्फिडेंट अंदाज ठळकपणे जाणवतो. मात्र चेहऱ्यावर उमटलेले अश्रूंचे चिन्ह तिच्या पात्राच्या वेदना आणि संघर्षाची कहाणी सांगत असल्याची भावना निर्माण करतात. रॅम्पवर चालताना मागे साजरा होत असलेला जल्लोष आणि तिच्या चेहऱ्यावर उमटलेली वेदना यांचे विरोधाभासी चित्र सिनेमातील कथानकाबद्दल कुतूहल निर्माण करते. Toxic
कियाराचा रोल काय आहे?
पोस्टर शेअर करताना यशने कियारा साकारणार्या पात्राचे नावही जाहीर केले. ‘नादिया’ या नावाने कियारा स्क्रीनवर दिसणार असून तिची भूमिका कथानकात महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे. चित्रपटातील हा पात्र भावनिक, ताकदवान आणि एका गूढ संघर्षाशी झुंज देणारे असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कियारा आडवाणीचा हा भावनांनी भरलेला लुक पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “OMG काय लुक आहे!”, “आता टीजरची प्रतीक्षा असह्य झाली आहे” अशा कमेंट्सने सोशल मीडिया भरून गेला आहे. काही चाहत्यांनी ‘टॉक्सिक’ हाच भारतातील सर्वात मोठा चित्रपट ठरणार असल्याचेही म्हटले आहे.
गीतू मोहनदास यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा चित्रपट यशच्या करिअरमधील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. लेखन आणि निर्मितीतही यशची प्रमुख भूमिका आहे. यशचा पहिला लुक मार्च 2025 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता, जो प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. ‘टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कियारा आडवाणीचा लुक जाहीर झाल्यानंतर आता चाहत्यांच्या नजरा टीजर आणि ट्रेलरकडे लागल्या आहेत. चित्रपटाची कथा, पात्रांची मांडणी आणि दिग्दर्शनाबाबत मोठी अपेक्षा असल्यामुळे ‘टॉक्सिक’चे प्रदर्शन वर्षातील सर्वात मोठा सिनेमॅटिक इव्हेंट ठरेल, अशी चर्चा जोरात आहे.





