बॉलिवूडमध्ये 2025 च्या शेवटच्या तिमाहीतही रोमँटिक मनोरंजनाची कमतरता नाही. कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे या सुपरहिट ऑन–स्क्रीन जोडीचा ‘तू मेरी मैं तेरा’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर 18 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि काही तासांतच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. धर्मा प्रोडक्शन्स आणि नमः पिक्चर्सच्या बॅनरखाली साकारलेल्या या प्रेमकथेची झलक पाहण्यासाठी चाहते बराच काळ प्रतीक्षा करत होते. ट्रेलरमधून प्रेम, विनोद, परस्परांना ओळखण्याचा प्रवास आणि कौटुंबिक अडचणींचं वास्तव अशा अनेक पैलूंचा अनुभव मिळतो.
ट्रेलरची सुरुवातच एका विचार करायला लावणाऱ्या वाक्याने होते:
“किस्से, कहानियां, चर्चे अधूरे इश्क के ही होते हैं.”
या संवादाने निर्मात्यांनी कथानकाची भावनिक बाजू अधोरेखित केली आहे.
कार्तिक ‘रे’ या आत्मविश्वासू, चंचल स्वभावाच्या तरुणाची भूमिका साकारतो. तर अनन्या ‘रूमी’च्या रूपात दिसते – ज्याला 2025 च्या हुकअप कल्चरमध्ये खऱ्या प्रेमाचा शोध आहे. दोघांची भेट एका प्रवासात होते. अवघडलेली सुरुवात, छोट्या–मोठ्या तणावांतून निर्माण होणारी जवळीक, आणि हळूहळू आकार घेणारा प्रेमाचा प्रवास हे ट्रेलरमध्ये स्पष्टपणे जाणवतं.
लोकेशन्स आणि मेकिंगने खेचले लक्ष
क्रोएशियाच्या मनमोहक किनाऱ्यांवर चित्रित केलेले रोमँटिक दृश्ये प्रेक्षकांना मोहवतात. समुद्रकिनाऱ्यावरची वॉक, म्युझिक, भावनिक संवाद, नृत्य सीक्वेन्सेस आणि रंगतदार संवाद यामुळे हा चित्रपट सिनेमाघरात मोठ्या पडद्यावर पाहण्यासारखा ठरेल, असे संकेत ट्रेलरमध्ये मिळतात. कार्तिकची कॉमिक टाइमिंग पुन्हा एकदा प्रभाव टाकते. अनन्याचा नैसर्गिक, सहज अभिनय पात्राला हलकेफुलके आणि नाजूक टच देतो. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांनी आधीच पसंत केली आहे.
दमदार स्टारकास्ट
दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेते समीर विद्वांस यांनी सांभाळली आहे. त्यामुळे चित्रपटात भावनिक खोली आणि नातेसंबंधातील गुंतागुंत वास्तववादी पद्धतीने पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. सपोर्टिंग कास्टमध्ये नीना गु्प्ता, जैकी श्रॉफ आणि टीकू तलसानिया यांसारखे अनुभवी कलाकार आहेत. कथानकात पालक–मुलांच्या नात्यातील संघर्ष, प्रेमविवाहावरील कुटुंबाचा दबाव आणि व्यक्तिमत्त्व शोधण्याच्या प्रवासाची छटा दिसते. या पैलूंमुळे चित्रपट हा फक्त रोमँटिक कॉमेडी न राहता, भावनिक स्तरावरही भिडणारा ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सोशल मीडियावर उत्साह
ट्रेलर रिलीज होताच यूट्यूब आणि एक्सवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. सिनेमातील गाणी आधीच लोकप्रिय झाले असून ट्रेलरच्या प्रदर्शना नंतर त्याचे व्ह्यूज झपाट्याने वाढू लागले. काहींनी या जोडीला यंदाचे सर्वात गोड ऑन–स्क्रीन कपल म्हटलं आहे.
*रिलीज डेट आणि अपेक्षा*
चित्रपट 25 डिसेंबर 2025 रोजी ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित होणार असून हा सणासुदीचा मोठा रिलीज मानला जात आहे. वर्षाखेरीस येणाऱ्या इतर मोठ्या चित्रपटांशी स्पर्धा असणार असली तरी कार्तिक–अनन्या जोडी तोडेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
रोमँटिक वळण, विनोदाची फोडणी, सुंदर लोकेशन्स आणि भावनिक नातेसंबंधांचा आधार, या सर्वांचा मिलाफ ‘तू मेरी मैं तेरा’ला बॉलिवूडमध्ये एक खास स्थान देऊ शकतो. आता प्रेक्षकांना चित्रपटाच्या प्रदर्शनाचीच आतुरता आहे.





