Urfi Javed : रिअॅलिटी शो स्टार आणि सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेदची चर्चा नेहमी तिच्या विचित्र ड्रेसिंग सेन्स किंवा बेधडक विधानांमुळे रंगत असते. मात्र यावेळी तिच्या चर्चेत येण्याचं कारण पूर्णपणे वेगळं आहे. 22 डिसेंबरच्या पहाटे उर्फी मुंबईतील दादाभाई नौरोजी पोलीस स्टेशनमध्ये दिसली आणि तिच्या या अचानक पोलीस स्टेशन भेटीने इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.
इंस्टाग्रामवर शेअर केला अनुभव (Urfi Javed)
पहाटे 5 वाजताच्या सुमारास उर्फीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोलीस स्टेशनमधील एक फोटो शेअर केला. या फोटोसोबत तिने लिहिलं की, “पहाटेचे 5 वाजले आहेत आणि मी पोलीस स्टेशनमध्ये आहे. हा माझ्या आयुष्यातला सर्वात भयावह अनुभव आहे. मी आणि माझ्या बहिणींनी संपूर्ण रात्री झोपही घेतली नाही.” इतकंच नाही तर तिने स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल चिंताही व्यक्त केली. मात्र नेमकं कोणतं कारण होतं, कोणत्या घटनेमुळे तिला पोलीसांकडे धाव घ्यावी लागली याबद्दल तिने अजून कोणताही खुलासा केलेला नाही.
मुंबईत सुरक्षेचा धोका?
उर्फी जावेदसोबत (Urfi Javed) तिची बहिण डॉली जावेद देखील पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होती. डॉलीनेही सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट टाकत गेल्या आठवड्यात मुंबईत दुसऱ्यांदा तिला असुरक्षित वाटल्याचं सांगितलं. तिच्या या विधानानंतर अनेकांनी सुरक्षा व्यवस्थेलाच प्रश्न विचारत प्रतिक्रिया दिल्या. सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे की त्यांना कुणाकडून धमक्या मिळत आहेत का, की कुणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे?
या प्रकरणाकडे अनेकजण जुन्या विवादांच्या अंगानेही पाहण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण उर्फी जावेद ही नेहमीच ट्रोल्स, हेटर्स आणि धमक्यांमुळे चर्चेत राहिली आहे. अनेक वेळा ती सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित नसल्याची भावना व्यक्त करत आली आहे. त्यामुळे या नव्या घटनेमागेही कुणीतरी धमकी दिली असण्याची शक्यता लोक व्यक्त करत आहेत. तथापि, पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
उर्फी जावेदनं अभिनय कारकिर्दीची सुरुवात मालिकांमधून केली. ‘बडे भैया की दुल्हनिया’, ‘कसौटी जिंदगी की 2’ आणि ‘मेरी दुर्गा’ या मालिकांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका केल्या. मात्र अभिनयातून अपेक्षित यश न मिळाल्याने तिने रिअॅलिटी शोमध्ये प्रयत्न केले आणि 2021 मध्ये ‘बिग बॉस ओटीटी’मुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘द ट्रेटर्स’ या शोची विजेती ठरून तिने आणखी लोकांचे लक्ष वेधले. तसेच ‘फॉलो कर लो यार’ आणि दिबाकर बनर्जी यांच्या ‘लव सेक्स और धोखा 2’मध्येही ती झळकली आहे. आता ती स्प्लिट्सविला या लोकप्रिय शोच्या नवीन सीझनमध्ये दिसणार आहे.
उर्फी आणि डॉलीच्या पोलीस स्टेशन भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या फॅन्समध्ये प्रचंड चिंता पसरली आहे. अनेक जण सोशल मीडिया कमेंट्समध्ये विचारत आहेत की, उर्फीसोबत काही गंभीर प्रकार झाला का? कुणीतरी तिच्या घरी घुसण्याचा प्रयत्न केला का? किंवा कुणीतरी सतत तिचा पाठलाग करत आहे का? मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप अस्पष्टच आहेत.
एकंदरीत, उर्फी जावेदच्या या पहाटेच्या ‘पोलीस स्टेशन व्हिजिट’ने मोठी चर्चा निर्माण केली आहे आणि तिच्या पुढील खुलाशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिच्या सुरक्षिततेबद्दल फॅन्स अत्यंत चिंतेत आहेत आणि पोलिसांकडूनही लवकरच स्पष्ट माहिती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





