Wed, Dec 24, 2025

अगस्त्यच्या ‘इक्कीस’ने भारावले अमिताभ; नातवाच्या अभिनयावर बिग बींची भावूक प्रतिक्रिया

Published:
अमिताभ म्हणाले की, नातू पडद्यावर दिसण्याचा आनंद वेगळाच असतो. त्यांनी लिहिले, “भावना इतक्या प्रबळ झाल्या की शब्द सुचत नाहीत. श्वेताला लेबर पेनमुळे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हाचा क्षण आजही आठवतो
अगस्त्यच्या ‘इक्कीस’ने भारावले अमिताभ; नातवाच्या अभिनयावर बिग बींची भावूक प्रतिक्रिया

श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘इक्कीस’ हा बहुप्रतीक्षित बायोग्राफिकल वॉर ड्रामा 1 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचे नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अगस्त्य नंदा या चित्रपटात 1971 च्या भारत-पाक युद्धात शौर्याने लढून शहीद झालेल्या आणि सर्वात कमी वयात परमवीर चक्र मिळवणाऱ्या सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित भूमिका साकारत आहेत. त्यांच्या पहिल्या मोठ्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

सोमवारच्या संध्याकाळी ‘इक्कीस’ची स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आली होती. या स्क्रीनिंगला अमिताभ बच्चन, अक्षय कुमारसह अनेक नामांकित कलाकार हजेरी लावली. चित्रपट पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमधून नातवाबद्दलचा अभिमान आणि भावना मोकळ्या शब्दांत व्यक्त केल्या.

काय म्हणाले अमिताभ

अमिताभ म्हणाले की, नातू पडद्यावर दिसण्याचा आनंद वेगळाच असतो. त्यांनी लिहिले, “भावना इतक्या प्रबळ झाल्या की शब्द सुचत नाहीत. श्वेताला लेबर पेनमुळे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हाचा क्षण आजही आठवतो. काही तासांनंतर पहिल्यांदा अगस्त्यला हातात घेतलं, त्याच्या निळ्या डोळ्यांबद्दल बोललो. मोठा होत गेला तसे त्याचे निरागस कृत्य, माझ्या दाढीशी खेळणे, हे सारे पुन्हा डोळ्यासमोर उभं राहिलं.”

ते पुढे म्हणाले की, आज एक अभिनेता म्हणून त्याला वाढताना पाहून समाधान वाटतं. “तो जेव्हा स्क्रीनवर दिसला, तेव्हा नजर हटत नव्हती. त्याच्या अभिनयात सादगी, प्रामाणिकता, कोणताही दिखाऊपणा नव्हता. अरुण खेत्रपाल या शूर सैनिकाची भूमिका त्याने ज्या निष्ठेने आणि भावनेने साकारली, ती प्रत्येक फ्रेममध्ये जाणवत होती. हे फक्त नात्याचं कौतुक नाही, तर एका प्रेक्षकाची खरी प्रतिक्रिया आहे.”

चित्रपटात आणखी कोण कोण

अगस्त्य नंदाच्या या पदार्पणातील भूमिकेसोबतच चित्रपटात धर्मेंद्र, जयदीप अहलावत, सिमर भाटिया, सुहासिनी मुले, सिकंदर खेर, राहुल देव, दीपक डोबरियाल, विवान शाह आणि गुनीत सांधू यांसारखे अनुभवी कलाकारही झळकणार आहेत. या दमदार कलाकारांमुळे चित्रपटाची ताकद अधिक वाढली आहे.

‘इक्कीस’च्या स्क्रीनिंगनंतर इंडस्ट्रीतून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षाही अधिक वाढल्या आहेत. अरुण खेत्रपाल यांच्या अद्भुत शौर्याची कहाणी आणि नव्या पिढीतील अभिनेता अगस्त्य नंदाचा प्रभावी अभिनय  या दोन्हीमुळे हा चित्रपट नव्या वर्षाची दमदार सुरुवात ठरेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.