वाहनचालकांसाठी खूशखबर, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती घटण्याचे पेट्रोलियम मंत्र्यांचे संकेत

Written by:Smita Gangurde
Published:
रेटिंग एजन्सींच्या अनुसार तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर 12 ते 15 रुपये आणि डिझेलवर 6 ते 12 रुपयांचा नफा होतोय. हा फायदा असूनही तेल कंपन्या गेल्या वर्षभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात करत नाहीयेत.
वाहनचालकांसाठी खूशखबर, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती घटण्याचे पेट्रोलियम मंत्र्यांचे संकेत

नवी दिल्ली- देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात. पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी हे संकेत दिले आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती दीर्घ कालावधीसाठी 65 डॉलर प्रति बॅरल राहिल्या तर येत्या 2 ते 3 महिन्यांत पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

दिल्लीत सुरु असलेल्या ऊर्जा वार्ता 2025 या कार्यक्रमात बोलताना पेट्रोलियम मंत्र्यांनी हे संकेत दिले आहेत. मात्र हे सगळं जागतिक पातळीवरील स्थिरतेवर अवलंबून असल्याचंही त्यांनी सांगितलंय. इराण आणि इस्रायल सारखी युद्ध स्थिती असेल तर स्थिती बदलू शकते असंही त्यांनी सांगितलंय. सद्यस्थितीत जागतिक बाजारपेठेत 65 डॉलर प्रति बॅरल झालेल्या आहेत. यातून तेलाचं मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांना सुगीचे दिवस आले आहेत. अशा स्थितीत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करुन जनतेला दिलासा देण्याची सरकारची योजना आहे.

पेट्रोल आणि डिझेल किमान पाच रुपयांपेक्षाही जास्त स्वस्त होऊ शकतं. मात्र तेल कंपन्या नेमके किती दर कमी करतात यावर हे अवलंबून असण्याची शक्यता आहे.

कंपन्यांना पेट्रोल प्रति लिटर 15 रुपयांचा होतोय फायदा

रेटिंग एजन्सींच्या अनुसार तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर 12 ते 15 रुपये आणि डिझेलवर 6 ते 12 रुपयांचा नफा होतोय. हा फायदा असूनही तेल कंपन्या गेल्या वर्षभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात करत नाहीयेत.

गेल्या काही महिन्यांमध्ये तेल कंपन्या भाव कमी करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र एप्रिलमध्ये सरकारनं प्रति लिटर 2 रुपयांनी एक्साईज ड्युटी वाढवली होती. यानंतर कंपन्यांनी भाव कमी करण्याचं टाळलं. दीर्घ काळ तोट्याचं कारण देत तेल कंपन्या भाव कमी करत नाहीयेत.

पेट्रोलवर प्रति लिटर 22 रुपये केंद्राचा कर

केंद्रसरकार पेट्रोलवर 21 रुपये 90 पैसे कर घेतेय. दिल्लीत सरकार 15.40 रुपये वॅट घेतेय. एकूण टॅक्स 37.20 रुपये प्रति लिटर आहे. डिझेलवर केंद्र सरकार 17.80 रुपये प्रति लिटर टॅक्स घेतेय. तर दिल्ली सरकार वॅटच्या स्वरुपात 12.83 रुपये प्रतिलिटर घेतेय.

Follow Us :GoogleNews