जायचं होतं मंदिरात, Google Mapनं पोहचवलं तलावात, चार मित्रांचा थोडक्यात वाचला जीव

Written by:Smita Gangurde
Published:
गुगल मॅपवर विसंबून राहून प्रवास करताना अपघात घडल्याची ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही असे प्रकार समोर आलेले आहेत.
जायचं होतं मंदिरात, Google Mapनं पोहचवलं तलावात, चार मित्रांचा थोडक्यात वाचला जीव

मेरठ- उत्तर पर्दएशातील मेरठमध्ये गुगल मॅपच्या भरवश्यावर कारमधून चाललेल्या चार मित्रांचा जीव थोडक्यात बचावलाय. हे चारही मित्र अंबालाच्या महर्षी मारकंडेश्वर मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. सरसावात प्रवेश केल्यानंतर या चौघांनी गुगल मॅपमध्ये मंदिराचं लोकेशन टाकलं.

गुगल मॅपवर लोकेशन टाकल्यानंतर चुकीचा मार्ग दाखवण्यात आला. कार वाट चुकली आणि शहराबाहेर असलेल्या एका तलावात जाऊन कोसळली. गुगल मॅपनं चुकीची दिशा दाखवल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. कार तलावात जात असल्याचं पाहून समयसूचकता दाखवत चारही मित्रांनी कारमधून उड्या मारल्या त्यामुळं त्यांचा जीव वाचला.

नेमका काय घडला प्रकार?

मेरठमध्ये असलेल्या चौधरी चरणसिंह विश्वविद्यालयातील विद्यार्थी नेता सूर्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काही कार्यकर्त्यांना घेऊन अंबालाच्या दिशेनं निघाला होता. यात आदित्य, अनुज आणि आशुतोष यांचा समावेश होता. ब्रिझा कामधून अंबालाच्या शाहाबाद परिसरात असलेल्या महर्षी मारकंडेश्वर मंदिरात दर्शनासाठी हे चौघेजण निघाले होते.

गुगल मॅपनं चुकीचा मार्ग दाखवला

कार सरसावा परिसरात पोहचल्यानंतर ड्रायव्हरनं महर्षी मारकंडेश्वर मंदिराचं लोकेशन गुगल मॅपवर टाकलं. गुगल मॅपनी सांगितलेल्या दिशेनं ब्रिझा कार धावत होती. अंबाला रस्त्यावर असलेल्या सिरोही पॅलेसजवळ गुगल मॅपनं दाखवलेल्या दिशेनं कार वळाली आणि थेट तलावात जाऊन पडली.

तलाव असल्याचा अंदाजच आला नाही

गाडी चालवत असलेल्या आदित्यला पुढे तलाव आहे हे लक्षातच आलं नाही. अचानक कार पाण्यात पडल्यानं गाडीतले चौघेही जण आधी भांभावून गेले. त्यानंतर तातडीनं त्यांनी काचा खाली करत पाण्यात उड्या मारल्या. चौघंही बुडत्या कारमधून बाहेर पडण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर या चौघांनी पोलिसांना ही माहिती कळवण्यात आल्यानंतर मदत कार्य सुरु करण्यात आलं.

काय काळजी घ्याल?

गुगल मॅपवर विसंबून राहून प्रवास करताना अपघात घडल्याची ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही असे प्रकार समोर आलेले आहेत. कार किंवा दुचाकी चालवताना अनोळख्या शहरात अनेकजणं प्रवासाची दिशा जाणून घेण्यासाठी गुगल मॅपची मदत घेतात. मात्र लोकेशन चुकीचं दाखवलं तर असे अपघात घडण्याची शक्यता असते. विशेषता रात्रीच्या वेळी जास्त काळजी घेण्याची गरज आता व्यक्त होतेय. गुगल मॅपवर दिशा बघतानाच रस्त्यात गाडी थांबवून स्थानिकांना पत्ता विचारल्यास असे अपघात टळू शकतील.