Mon, Dec 29, 2025

‘HSRP’ नंबर प्लेटची मुदत 3 दिवसांत संपणार; पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्र राज्याच्या परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परिवहन विभागाने नंबरप्लेट बसवण्यासाठी दिलेली ही पाचवी मुदतवाढ आहे.
‘HSRP’ नंबर प्लेटची मुदत 3 दिवसांत संपणार; पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी

राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) बसविण्याची सक्ती असून, त्यासाठी असलेली 30 नोव्हेंबरची मुदत आता राज्य सरकारने वाढवली आहे. परिवहन विभागाने ही मुदतवाढ देऊन नागरिकांना दिलासा दिला आहे. ही मुदतवाढ अंतिम असून, आता वाहनधारकांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत नंबर प्लेट बसविणे बंधनकारक आहे. या मुदतवाढीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी, 31 डिसेंबरनंतर एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहन आयुक्तांकडून देण्यात आला आहे.

लाखो वाहने ‘HSRP’ विना रस्त्यावर!

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) लावणे बंधनकारक असले तरी पुण्यात याबाबत उदासीनता दिसून येत आहे. शहरातील २४ लाखांहून अधिक वाहनांपैकी केवळ सुमारे 10 लाख वाहनांवरच ही प्लेट बसवण्यात आली आहे. 31 डिसेंबर ही अंतिम मुदत असल्याने आरटीओकडून कारवाईचा इशारा देण्यात आला असून, वाहनधारकांची धावपळ वाढली आहे. पुण्याची आकडेवारी पाहता एकूणच लाखो वाहने अद्यापही एचएसआरपी नंबर प्लेटविना रस्त्यावर धावत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

31 तारखेच्या पूर्वी HSRP नंबर प्लेट बसवा !

महाराष्ट्र राज्याच्या परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परिवहन विभागाने नंबरप्लेट बसवण्यासाठी दिलेली ही पाचवी मुदतवाढ आहे. सोलापुरात वाहनधारकांची उदासीनता दिसत आहे. 1 एप्रिल 2019 च्या अगोदरची 7 लाख वाहन धारकांनी उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवून घेतली नाही. परिवहन अधिकाऱ्यांनी वाहनधारकांना आवाहन केले आहे, शासनाने 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यापूर्वी वाहनधारकांनी उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवून घ्यावे. राज्य शासनाने आजतागायत चार वेळा मुदतवाढ दिली आहे. यंदा 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. शासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली नाही तर एसएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर एक हजार रुपये दंड ऑनलाइनरित्या आकारला जाणार आहे.

HSRP नंबर प्लेटचे महत्व नेमके काय ?

HSRP (High Security Registration Plate) ही वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली नंबर प्लेट आहे, जी भारत सरकारने अनिवार्य केली आहे. महाराष्ट्रातही ही प्रणाली सक्तीने लागू करण्यात आली आहे. HSRP प्लेटमध्ये क्रोमियम-आधारित होलोग्राम, एक कोड, आणि स्थायिक क्लॅम्प्स असतात, जे नकली नंबर प्लेट्सपासून संरक्षण देतात. यामुळे वाहन चोरी रोखण्यास मदत होते आणि ट्रॅफिक व्यवस्थापन सुलभ होते. पोलिस आणि परिवहन विभागासाठी वाहन ओळखणे सोपे जाते. RTO कार्यालयातून अधिकृत वितरकांकडूनच ही प्लेट मिळते. HSRP लागू केल्याने महाराष्ट्रातील वाहनांचे नोंदणी आणि ट्रॅकिंग अधिक पारदर्शक व सुरक्षित झाले आहे. त्यामुळे ती अत्यंत महत्त्वाची ठरते.

…अन्यथा भरावा लागेल मोठा दंड

प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले की, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख निश्चित आहे. या तारखेनंतर नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. यामध्ये HSRP साठी अर्ज केलेला असेल पण प्लेट बसवलेली नसेल तर ₹1,000 दंड होईल. HSRP साठी अर्जही केलेला नसेल आणि प्लेट बसवलेली नसेल तर ₹10,000 दंड भरावा लागणार आहे.