Mon, Dec 29, 2025

पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; अजित पवारांकडून मोठी घोषणा

Written by:Rohit Shinde
Published:
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, अशी घोषणा अजित पवारांकडून करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; अजित पवारांकडून मोठी घोषणा

सध्या राज्यात महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आता राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये महापालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. आज प्रचाराचा नारळ फोडताना अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, आज पुण्यातील मविआच्या बैठकीला शरद पवार यांचा पक्ष गैरहजर असल्याने उद्या अधिकृत घोषणा होणार असल्याचीही सुत्रांची माहिती आहे.

अखेर दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. सुरुवातीला  या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरु होती. मात्र, ही चर्चा फिस्कटल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्याने पुन्हा ह्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या. आता, स्वत: अजित पवार यांनीची दोन राष्ट्रवादी एकत्र येत निवडणुका लढणार असल्याची घोषणा केली.

पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घोषणा केली आहे. कालच माध्यमांनी (शनिवारी) मविआ वगळता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने पहिली बैठक झाल्याची बातमी दिली होती. अखेर एबीपी माझाच्या या वृत्तावर शिक्कामोर्तब झालाय. खासदार अमोल कोल्हे आणि रोहित पवारांसोबत झालेल्या तीन गुप्त बैठकांमध्ये अजित पवारांची बरीच चर्चा झाली होती. अखेर या बैठकांना आता मूर्तरूप आल्याचं दिसून येत आहे. उद्याच या दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर होऊ शकते.

अजित पवारांची भाजपावर टीका

अजित पवार म्हणाले की, ही निवडणूक फार उशिरा आली. कार्यकर्ता जपला पाहिजे, त्याला मान दिला पाहिजे कारण आम्ही शिव- शाहू- फुले आंबेडकरांच्या विचारांनी काम करतो. मी खासदार झालो तेव्हा पी व्ही नरसिंगराव मंत्री होते. शेतकरी कुटुंबातील मी कार्यकर्ता. शरद पवार तेव्हा चांगलं काम करत होते. मला खासदार केल्यावर हा शहरात विकास झाला पाहिजे अस वाटायचं. अनेक ठिकाणाहून लोक इथे नोकरीला यायचे.आता सुधारणा झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेला ज्यांनी कर्जात ढकललं आहे त्यांना बाजूला करायच आहे. माझी केंद्रात ओळख आहे. प्रश्न सोडवता येईल. आपल्या विचारांचे काही खासदार आहे. त्यांच्याकडून काम करुन घायचं आहे. शेतकरी तुमची माझी जात आहे. दोन दिवस कळ काढा सगळं समजेल. भूलथपांना बळी पडू नका. काही लोकांची दहशत नेस्तनाबूत करायची आहे असंही अजित पवार म्हणाले आहेत.

कुदळवाडीत जमीनी बळकावण्यात आल्या. संत पिठात वारकरी घडवायचे होते. मात्र, तिथे CBSE स्कूल सुरू केली. संत पिठात गीता रामायण शिकवण्यात येत नाही. संत पिठात कंपनी सुरू केली. संत पीठ हे फक्त नावा पुरते राहिले आहे. जे ठरलं होतं ते का थांबवण्यात आलं? वेगळ्या पद्धतीच राजकारण जे चालल ते थांबवायला हवं. पिंपरी चिंचवड शहरातील माझ्या 25 वर्षाच्या माझ्या राजकारणात मी कधी कर्ज काढलं नव्हतं. आज महापालिकेवर कर्ज झाला आहे. हे पाप कोणाच? असंही अजित पवार म्हणाले.