Tue, Dec 30, 2025

Soyabean Price: अखेर सोयाबीनच्या दरात वाढ; आज कुठे अन् किती भाव ?

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्रातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये आता सोयाबीनच्या दरामध्ये चांगलीच सुधारणा होताना दिसत आहे. दरामध्ये वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Soyabean Price: अखेर सोयाबीनच्या दरात वाढ; आज कुठे अन् किती भाव ?

सोयाबीन बाजारात सध्या दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. नव्या हंगामातील आवक वाढत असताना काही बाजार समित्यांमध्ये दर वाढताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी घसरण नोंदवली जात आहे. मात्र एकुणच राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या दरामध्ये चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे. आज सोमवार, 29 डिसेंबर रोजी राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये दराची नेमकी काय स्थिती राहिली, कुठे आवक किती झाली ? या बाबी सविस्तर जाणून घेऊ.

राज्यभरात सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा

खरीप हंगामातील सोयाबीनची आवक सध्या राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये वाढलेली दिसून येत असून, त्यानुसार दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. 28 आणि 29 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या व्यवहारांनुसार काही बाजारांत सोयाबीनला समाधानकारक भाव मिळाला असला, तरी काही ठिकाणी कमी दरामुळे शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. 29 डिसेंबर रोजी जळगाव बाजार समितीत सोयाबीनची चांगली आवक नोंदवण्यात आली. येथे एकूण 135 क्विंटल सोयाबीनला प्रति क्विंटल 5328 रुपये असा स्थिर दर मिळाला. मात्र, जळगावमध्येच लोकल सोयाबीनच्या 279 क्विंटल आवकीसाठी किमान 4200 ते कमाल 4780 रुपये दर मिळाला असून, सर्वसाधारण दर 4700 रुपये राहिला. यावरून दर्जानुसार दरात लक्षणीय फरक दिसून येतो.
नागपूर बाजार समितीत 922 क्विंटल लोकल सोयाबीनची मोठी आवक झाली. येथे किमान 4000 ते कमाल 4700 रुपये दर नोंदवण्यात आला असून, सरासरी दर 4525 रुपये राहिला. विदर्भातील काही भागांत दर्जेदार मालाला तुलनेने चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी वाढलेल्या आवकेमुळे दरांवर दबाव जाणवत आहे.
मराठवाड्यातील जळकोट बाजारात पांढऱ्या सोयाबीनची 377 क्विंटल आवक झाली. येथे 4600 ते 4900 रुपये दर मिळाला असून, सर्वसाधारण दर 4750 रुपये राहिला. याच बाजारात 28 डिसेंबर रोजी तब्बल 707 क्विंटल आवक झाली होती, तेव्हा सरासरी दर 4800 रुपये होता. त्यामुळे जळकोटमध्ये सोयाबीनचे दर तुलनेने स्थिर असल्याचे चित्र आहे.
सोयाबीनच्या दरात अस्थिरता नेमकी कशामुळे? 

महाराष्ट्रात सोयाबीनच्या दरात अलीकडे कमालीची अस्थिरता दिसून येत आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा माल भिजला असून त्यामुळे उत्पादनाची प्रत ढासळली आहे. खराब गुणवत्तेमुळे बाजार समित्यांत दर घसरत आहेत. त्यातच बाजारपेठांमध्ये होणारी अस्थिर आवक आणि व्यापाऱ्यांचा कमी प्रतिसाद यामुळे भावात चढ-उतार वाढले आहेत. काही दिवशी आवक जास्त असल्याने दर कमी होतात, तर आवक घटली की अचानक वाढतात. या अनिश्चित परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आले असून स्थिर दर मिळण्यासाठी सरकारी हस्तक्षेप आणि खरेदी धोरणांची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे.