Konkan Railway : महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांना मोठा चालना देणारी महत्त्वाची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. राज्यात सुरू असलेल्या विविध रेल्वे प्रकल्पांसाठी तब्बल 23 हजार 926 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यामुळे रेल्वे नेटवर्कचा विस्तार आणि आधुनिकीकरण वेगाने होणार आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे प्रकल्पांसाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदींची सविस्तर माहिती दिली. सध्या महाराष्ट्रात एकूण 1 लाख 70 हजार कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर असून, त्यामध्ये दुहेरीकरण, चौपदरीकरण आणि नवीन मार्गांचा समावेश आहे.
संपूर्ण कोकण रेल्वेचे दुहेरीकरण (Konkan Railway)
मुंबई–कोकण मार्गासह संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली. यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला असून, तो सध्या मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. या प्रकल्पांतर्गत बोगद्यांचे मजबुतीकरण, रेल्वे रुळांचे अद्ययावतीकरण, आधुनिक तांत्रिक सुधारणा यासारखी महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर कोकण रेल्वेवरील प्रवासी आणि मालगाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येणार आहे.
कोकण रेल्वेसाठी 515 कोटींची विशेष तरतूद
कोंकण रेल्वेच्या प्रवासी वर्गासाठी आणि संपूर्ण कोंकण किनारपट्टीसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोकण रेल्वेच्या विकासासाठी 515 कोटी रुपयांची विशेष अर्थसंकल्पीय तरतूद जाहीर केली आहे. या निधीमुळे कोकण रेल्वेचे आधुनिकीकरण मार्गाची वहन क्षमता वाढ दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Konkan Railway
कोकण रेल्वे ही केवळ मार्ग नाही, तर किनारपट्टीची जीवनवाहिनी
कोकण रेल्वेचे महत्त्व अधोरेखित करताना रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले की, “कोकण रेल्वे हा केवळ एक रेल्वे मार्ग नसून, देशाच्या संपूर्ण किनारपट्टी भागाला जोडणारी एक महत्त्वाची जीवनवाहिनी आहे. वाढती प्रवासी संख्या आणि मालवाहतूक लक्षात घेता, या मार्गाची क्षमता वाढवणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
दुहेरीकरण आणि सुधारणा प्रकल्प अंतिम टप्प्यात
या बैठकीदरम्यान रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले की कोकण रेल्वेच्या विभागांचे दुहेरीकरण रेल्वे पायाभूत सुधारणा यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण झाला असून, तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या प्रकल्पांना हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. या वेळी कोंकण रेल्वे (कारवार) प्रादेशिक व्यवस्थापक आशा शेट्टी, जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे, इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भौगोलिक आव्हानांवर मात करण्यासाठी विशेष उपाययोजना
कोकण रेल्वेचा मार्ग भौगोलिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असल्याने जुन्या बोगद्यांचे मजबुतीकरण, ट्रॅक तंत्रज्ञानात सुधारणा या कामांसाठी 515 कोटींचा निधी वापरण्यात येणार आहे. यामुळे रेल्वेची सुरक्षितता आणि गती दोन्ही वाढणार आहेत.
सुरक्षिततेवर विशेष भर; ‘कवच’ प्रणाली लागू होणार
या अर्थसंकल्पात केवळ विस्तारावरच नाही, तर रेल्वे सुरक्षिततेवरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. रेल्वे अपघात रोखण्यासाठी ‘कवच’ ही अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली कोकण रेल्वे मार्गावर लागू करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.
पुणे–हैदराबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पालाही गती
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या 1 लाख 70 हजार कोटी रुपयांची रेल्वे कामे सुरू असल्याचेही वैष्णव यांनी सांगितले. देशातील प्रमुख आयटी हब असलेली पुणे आणि हैदराबाद ही दोन्ही शहरे भविष्यात हाय-स्पीड रेल्वेने जोडली जाणार आहेत, अशी महत्त्वाची घोषणाही त्यांनी यावेळी केली.





