बारामती – अजित पवार यांच्या अकाली मृत्यूच्या धक्क्यातून अजूनही बारामतीकर सावरलेले नाहीत. दादांच्या विमान अपघातापूर्वी १० मिनिटांआधीचा अखेरचा कॉल समोर आलाय. बारामतीत झालेल्या पत्रकार परिषदेत दादांशी कार्यकर्त्याच्या झालेल्या संभाषणाच्या या ऑडिओ क्लीपमुळे बारामतीकरांना पुन्हा एकदा दादांचा आवाज ऐकता आला.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. दिलदार, दिलखुलास, प्रशासनावर पकड असलेल्या नेत्याला महाराष्ट्र मुकल्याची भावना व्यक्त झाली. त्यातही दु:खाचा डोंगर कोसळला तो बारामतीकरांवर. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर अपघात की घातपात अशा शंकाही व्यक्त करण्यात आल्या. या सगळ्यात विमान अपघातापूर्वी ९ मिनिटांपूर्वीचं अजित पवारांचं कॉलवरील संभाषण समोर आलंय. अजित पवारांचे पुतणे आणि कार्यकर्ते श्रीजीत पवार यांनी त्यांना कॉल केला होता. आज त्या कॉलचं रेकॉर्डिंग त्यांनी बारामतीत ऐकवलं.
अजितदादांचं अखेरचं संभाषण
आपण सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारे आहोत, कुणावरही अन्याय होणार नाही, सगळ्यांना सोबत घएऊन न्याय देऊ. सगळ्यांना सोबत घेऊन न्याय देऊ, असं अजित पवार या संभाषणात सांगतायेत. जातीभेद न मानणाऱ्या आणि सगळ्यांना संधी देणारे अजित पवार यानिमित्तानं सगळ्यांना पुन्हा अनुभवता आले.
पवार कुटुंबीय एकत्र
दुसरीकडे बारामतीत विद्या प्रतिष्ठानमध्ये पार्थ आणि जय पवार यांच्यासोबत शरद पवारांची बैठक पार पडली. अजित पवार यांच्या भगिनीही या बैठकीला उपस्थिती होत्या. विद्या प्रतिष्ठानमध्ये ज्या ठिकाणी अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले, त्या परिसरात अजितदादांचं मोठं स्मारक बांधण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. यासोबतच विद्या प्रतिष्ठानच्या संचालक मंडळावर अजित पवारांनंतर कोण असेल, याचीही चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. बैठकीनंतर स्मारकासाठीच्या दोन जागांची पाहणीही शरद पवारांनी केली.
त्यापूर्वी सकाळी शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना विलिनीकरणाच्या चर्चांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं.
रात्री उशिरा शरद पवार, प्रतिभा पवार, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार हे सगळेजण आज अजित पवारांच्या घरी सांत्वनासाठी एकत्र आले होते. आता या बैठकीत काय ठरलंय हे पाहावं लागणार आहे.





