Ajit Pawar Plane Accident : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेनंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून या प्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बारामतीजवळ लँडिंगपूर्वी विमान कोसळल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेनंतर अपघातामागील नेमके कारण काय याबाबत चर्चा आणि तर्कवितर्क सुरू झाले आहेत. त्यातच आता अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
बजरंग सोनावणे यांचे विधान चर्चेत (Ajit Pawar Plane Accident)
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनावणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या घटनेबाबत गंभीर शंका व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, उपलब्ध व्हिडिओ फुटेजमध्ये विमान जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच हवेत स्फोट झाल्यासारखी स्थिती दिसते. त्यामुळे नेमकं काय घडलं याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, “ही केवळ दुर्घटना होती की अन्य काही कारण होते? अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का?? दोन स्फोट कसे झाले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. Ajit Pawar Plane Accident
प्राथमिक अहवालात काय नमूद?
लँडिंगपूर्व टप्प्यात विमानाच्या इंजिन किंवा कंट्रोल सिस्टीममध्ये अचानक बिघाड निर्माण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे विमानाचे संतुलन ढासळले आणि वैमानिकाचे नियंत्रण कमी झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. विमान उतरताना योग्य अँगल आणि उंचीचा अंदाज चुकल्याचेही अहवालात नमूद असल्याचे बोलले जात आहे. पहिल्या प्रयत्नात लँडिंग यशस्वी न झाल्याने वैमानिकाने ‘गो-अराउंड’ घेऊन पुन्हा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या प्रयत्नादरम्यान विमान अस्थिर झाले आणि नियंत्रण सुटल्याने दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, सर्व माहिती गोळा केल्यानंतरच ते सविस्तर बोलतील. संबंधित यंत्रणांकडून तपशील मागवला असून सत्य जनतेसमोर येणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.





