Marathi News

अजित पवारांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय!!

Published:
९ फेब्रुवारी रोजी असलेला आपला वाढदिवस यावर्षी साजरा करणार नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय!!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील निधनानंतर राज्यभरात शोक आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित पवार हे प्रशासनातील वेगवान निर्णयक्षमता, कामाचा धडाका आणि सर्वसामान्यांशी थेट संवाद यासाठी ओळखले जात होते. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातही भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत.याच पार्श्वभूमीवर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.

काय आहे शिंदेंचा निर्णय

९ फेब्रुवारी रोजी असलेला आपला वाढदिवस यावर्षी साजरा करणार नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत, पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू आणू नयेत, असे आवाहन त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाताच्या वृत्तामुळे राज्यावर दुःखाची छाया पसरली आहे. अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे योग्य नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. “ही वैयक्तिकदृष्ट्याही मोठी हानी आहे. एक सहकारी आणि जवळचा मित्र गमावल्याची भावना आहे. पवार कुटुंबाच्या दुःखात मी आणि माझा पक्ष सहभागी आहोत,” असे त्यांनी नमूद केले.

यापूर्वी अजित पवारांच्या निधनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिंदे यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीचा उल्लेख करताना सांगितले की, ते अत्यंत शिस्तप्रिय आणि वेळेचे भान ठेवणारे नेते होते. पहाटेपासून काम सुरू करून अधिकाऱ्यांकडून तत्काळ कामे पूर्ण करून घेण्याची त्यांची पद्धत होती. तसेच, या दुर्घटनेची सखोल चौकशी होणे गरजेचे असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना व्हाव्यात, अशीही त्यांनी भूमिका मांडली.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews