चंद्रपुरात महापालिका काँग्रेसच्या हातातून जाणार?, खासदार धानोरकर, आमदार वडेट्टीवारांचा वाद कायम, भाजपला संधी

Written by:Smita Gangurde
Published:
या वादात महापौरपदी कोण बसणार, असा प्रश्न अनेकांना पडलाय. अंबरनाथ पॅटर्नची पुनरावृत्ती चंद्रपुरात होणार का, याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे.
चंद्रपुरात महापालिका काँग्रेसच्या हातातून जाणार?, खासदार धानोरकर, आमदार वडेट्टीवारांचा वाद कायम, भाजपला संधी

नागपूर- चंद्रपुरात काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे महापलिका हातातून जाण्याची शक्यता आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील वादावर दिल्ली दरबारी काढण्यात आलेला तोडगाही अमान्य करण्यात आलाय. त्यामुळं चंद्रपुरात आता कुणाचा महापौर होणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल

महापालिकेत महापौर कोण होणार, या वादाचा निर्णय करण्यासाठी काँग्रेसच्यानगरसेवकांना थेट दिल्ली दौरा करावा लागला. चंद्रपूर महापालिकेत एकूण ६६ जागांपैकी काँग्रेसला २७ जागा मिळाल्या. काँग्रेससोबत असलेल्या शेकापला ३ तर ठाकरे शिवसेना आणि वंचित आघाडीला ८ जागा मिळाल्या. काँग्रेस, मित्रपक्ष आणि ठाकरे शिवसेना यांच्याकडे पूर्ण बहुमत असतानाही महापौर कुणाचा होणार, यावरुन वाद रंगला.

चंद्रपूरमध्ये काँग्रेसमध्ये काय वाद?

काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यात वर्चस्वाची लढाई आहे. महापालिकेतील काँग्रेस गटनेता निवडीवरून दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला. प्रतिभा धानोरकर यांच्याकडून 23 जानेवारीला समर्थक 13 नगरसेवकांसह काँग्रेस पक्षाच्या गटाची अधिकृत नोंदणी करण्यात आली. नोंदणीला आमदार वडेट्टीवार गटाचा आक्षेप, 18 नगरसेवक सोबत असल्याचा दावा वडेट्टीवार गटाकडून करण्यात आला. विभागीय आयुक्तांनी हे प्रकरण नगरविकास विभागाकडे सोपवलं. त्यावरही वडेट्टीवारांनी आक्षेप घेतला. काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांतील वाद थेट दिल्लीत पक्षेश्रेष्ठींकडे पोहचला. सगळ्या नगरसेवकांना दिल्लीत बोलवण्यात आलं. मात्र नगरसेवकांविना धानोरकर आणि वडेट्टीवार यांची काँग्रेस नेते के सी वेणूगोपाल यांच्यासोबत बैठक पार पडली.

धानोरकर गटाचा महापौर, वडेट्टीवार गटाचा उपमाहापौर आणि स्थायी समिती ठाकरे शिवसेनेकडे असा तोडगा के सी वेणूगोपाल यांनी काढला. मात्र हा तोडगा विजय वडेट्टीवार यांना अमान्य झाला. नगरसेवकांशी चर्चा न करताच वेणूगोपाल यांनी निर्णय दिल्याचं सांगण्यात येतंय. या तोडग्यावर नाराज असलेल्या विजय वडेट्टीवार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न बैठकीनंतर दिल्लीतही झाला. मात्र ते नाराज असल्याचं सांगण्यात येतंय.

भाजपचा महापौर होणार?

दिल्लीहून परतल्यानंतरही विजय वडेट्टीवार यांनी यावर प्रतिक्रिया देण्याचं टाळलंय. तर काँग्रेसचे इतर नेतेही सावध भूमिकेत दिसतायेत. दिल्लीत झालेला निर्णय सगळ्यांना मान्य असेल अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिलीय.दिल्लीत वाद सोडवण्यासाठी गेलेले काँग्रेसचे नगरसेवकही राज्यात परतलेत.
या सगळ्या वादावर लक्ष असून चंद्रपूर महापालिकेत भाजपचा महापौर होईल असा विश्वास आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंनी व्यक्त केलाय.
तर ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा हा काँग्रेसलाच राहील असं संजय राऊत यांनी सांगितलंय.

पुढं काय होणार?

गटबाजीचा शाप चंद्रपुरातल्या राजकारणाला लागलाय की काय असा प्रश्न या निमित्तानं समोर आलाय. भाजपत सुधार मुनंगटीवार विरुद्ध किशोर जोरगेवार या संघर्षात भाजपला चंद्रपूर महापालिका गमवावी लागलीय. तर काँग्रेसकडे संख्याबळ असूनही प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार वादात महापौरपदाचा निर्णय होताना दिसत नाहीये. आता या वादात महापौरपदी कोण बसणार, असा प्रश्न अनेकांना पडलाय. अंबरनाथ पॅटर्नची पुनरावृत्ती चंद्रपुरात होणार का, याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे.