Marathi News

देशातील 14 राज्यांमध्ये पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान विभागाचा महाराष्ट्राला अलर्ट!

Written by:Rohit Shinde
Published:
पुढील दोन दिवसांत देशातील जवळपास 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रात देखील या काळात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.
देशातील 14 राज्यांमध्ये पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान विभागाचा महाराष्ट्राला अलर्ट!

महाराष्ट्रासह देशभरात उद्यापासून पावसाचा जोर वाढणार आहे, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला असून, आयमडीकडून 14 राज्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या खाडीमध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा हा पश्चिमेकडे सरकत आहे, याचा मोठा परिणाम हा पावसावर होणार असून, देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात देखील मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज!

दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, हिमाच प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हा संपूर्ण आठवडा पावसाचा जोर कायम राहणार आहे, या राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, बिहारमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुळे पुढील 48 तासांमध्ये ओडिशा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्राला पाऊस झोडपणार; सतर्क रहा!

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, तर दुसरीकडे मराठवाड्यात देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान मराठवाड्यात यंदा पावसाचं प्रमाण कमी आहे, अनेक भागांमध्ये अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाहीये, मात्र आता जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाची शक्यता असून, उद्यापासून पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आज राज्यभर 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे. तर उद्यापासून चार दिवस ७ जिल्ह्यांसाठी विशेष धोक्याचा इशारा जारी करण्यात आला आहे. हा पाऊस राज्याच्या सर्वच भागांत बरसणार आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस धोकादायक राहणार आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीसमान पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews