भारतीय रेल्वेचे जाळे आणखी विस्तारणार; 3 नव्या मार्गांवर धावणार एक्स्प्रेस रेल्वे!

Written by:Rohit Shinde
Published:
भारतीय रेल्वेने तीन नव्या रेल्वेगाड्यांची घोषणा केली आहे. यात भावनगर-अयोध्या एक्सप्रेस, रिवा-पुणे एक्सप्रेस आणि जबलपूर-रायपूर एक्सप्रेस या तीन मार्गांचा समावेश आहे.
भारतीय रेल्वेचे जाळे आणखी विस्तारणार; 3 नव्या मार्गांवर धावणार एक्स्प्रेस रेल्वे!

देशभरातील रेल्वे जाळे अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वेने तीन नवीन रेल्वेगाड्यांचे उद्घाटन करण्याची घोषणा केली आहे. या नव्या रेल्वेसेवा तीर्थयात्रेकरू, सामान्य प्रवासी आणि व्यापारी वर्गासाठी फायदेशीर ठरणार आहेत.देशभरातील विविध राज्यांमध्ये रेल्वे नेटवर्क अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वेने तीन नव्या रेल्वेगाड्यांची घोषणा केली आहे. यात भावनगर-अयोध्या एक्सप्रेस, रिवा-पुणे एक्सप्रेस आणि जबलपूर-रायपूर एक्सप्रेस या तीन मार्गांचा समावेश आहे.

एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक कसे असेल?

भावनगर ते अयोध्या ही एक्स्प्रेस सेवा 11 ऑगस्टपासून प्रत्येक सोमवारी धावणार आहे. या गाडीचे थांबे गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील प्रमुख स्थानकांवर असतील. पुणे (हडपसर) ते रीवा ही सुपरफास्ट एक्स्प्रेस 7 ऑगस्टपासून प्रत्येक गुरुवारी पुण्याहून प्रस्थान करेल. परतीचा प्रवास 6 ऑगस्टपासून दर बुधवारी सुरू होणार आहे. ही ट्रेन मनमाड, भुसावळ, नागपूर व जबलपूर या मार्गाने जाईल. रायपूर-जबलपूर एक्स्प्रेस 4 ऑगस्टपासून रोजच चालवण्यात येणार आहे. रायपूरहून दुपारी 2:45 वाजता सुटून, रात्री 10:45 वाजता जबलपूरला पोहोचेल. परतीचा प्रवास सकाळी 6 वाजता सुरू होईल.

भावनगर-अयोध्या एक्सप्रेस गुजरातमधील भावनगर ते उत्तर प्रदेशातील अयोध्या दरम्यान धावेल आणि या मार्गात मध्य प्रदेशदेखील समाविष्ट असेल. रिवा-पुणे एक्सप्रेस मध्य प्रदेशातील रिवा ते महाराष्ट्रातील पुणे असा प्रवास करेल. तर, जबलपूर-रायपूर एक्सप्रेस ही रेल्वेगाडी मध्य प्रदेशातील जबलपूर आणि छत्तीसगडची राजधानी रायपूर यांना जोडेल.गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्यासह केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, डॉ. मनसुख मांडविया आणि निमुबेन बांभणिया यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 3) या नव्या रेल्वेगाड्यांना भावनगर येथून झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. या नव्या ट्रेन सेवा धार्मिक प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना, सर्वसामान्य प्रवाशांना आणि व्यवसायिक वर्गाला सोयीच्या ठरणार आहेत. तसेच या सेवेचा सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही मोठा लाभ होणार आहे.

नागपूर-इटारसी मार्गावर धावणार रेल्वे

मध्य प्रदेशातील आदिवासी प्रधान जिल्ह्यांच्या प्रगतीसाठी तसेच व्यापार-वाढीस चालना देण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एका नव्या रेल्वे मार्गाच्या उभारणीस मंजुरी दिली आहे. हा चौथा रेल्वे मार्ग लवकरच कार्यान्वित होणार असून, इटारसी ते नागपूर (महाराष्ट्र) दरम्यान नवीन रेल्वे ट्रॅक टाकण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक भागांचा विकास वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त करत मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

मध्य प्रदेशातील नर्मदापुर जिल्ह्यातील इटारसी ते नागपूर या नव्या रेल्वे मार्गाच्या विकासासाठी सुमारे 5,451 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग जवळपास 297 किलोमीटरचा असून, या प्रकल्पामुळे नर्मदापुर, बैतूल, पांढुर्णा (मध्य प्रदेश) तसेच नागपूर (महाराष्ट्र) या भागांना थेट लाभ होणार आहे. या नव्या मार्गावर एकूण 37 स्थानकांची आखणी करण्यात आली आहे. याशिवाय, 36 प्रमुख पूल आणि 415 लहान पूल उभारण्यात येणार आहेत. या मार्गावर 2 रेल्वे ओव्हरब्रिज, 74 अंडरपास, 4 बोगदे आणि 2 रेल्वे ओव्हर रेलिंग्स देखील असणार आहेत.