Mon, Dec 29, 2025

Onion Price: महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर स्थिर; कांदा उत्पादकांना दिलासा!

Written by:Rohit Shinde
Published:
मागील काही दिवसांपासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये चांगली स्थिरता पाहायला मिळत आहे. सध्या बाजारात दरांचा काय कल आहे, ते जाणून घेऊ...
Onion Price: महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर स्थिर; कांदा उत्पादकांना दिलासा!

महाराष्ट्रातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये आता कांद्याच्या दरामध्ये चांगली सुधारणा होताना दिसत आहे. त्यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना मात्र या निमित्ताने काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये आवक मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे दर कमी होते. मात्र आता दरामध्ये काहीशी सुधारणा होताना दिसत आहे.

बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर स्थिर

राज्याच्या कृषीमार्केटमध्ये गुरूवारी 99 हजार 523 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 33 हजार 858 क्विंटल सर्वाधिक आवक सोलापूर बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 100 ते 2800 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या कांद्यास आज 2800 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. बुधवारी मिळालेला सर्वाधिक दर आजही स्थिर आहे.

नाशिक बाजारात लाल कांद्याला किमान 400 रुपये तर कमाल 2008 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. खरंत बाजार समित्यांमधील कांद्याची आवक गेल्या काही दिवसांमध्ये लक्षणीयरित्या कमी झालेली आहे. परिणामी दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे सांगण्यात आहे. शिवाय बाजारातील कांद्याची मागणी मात्र सातत्याने वाढत आहे, याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

कांद्याच्या दरावर परिणाम करणारे घटक

कांद्याच्या दरावर अनेक घटकांचा परिणाम होतो. हवामानातील बदल, अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे कांद्याचे उत्पादन घटते किंवा वाढते, त्यामुळे दर चढ-उतार होतात. साठवणूक सुविधा अपुऱ्या असल्याने मोठ्या प्रमाणात कांदा खराब होतो आणि बाजारात तुटवडा निर्माण होतो. वाहतूक खर्च, इंधन दरवाढ तसेच मजुरी खर्च यामुळेही किंमती वाढतात. निर्यात–आयात धोरणे, शासनाचे निर्बंध किंवा सवलती यांचा थेट परिणाम दरांवर दिसून येतो. दलालांची साखळी, बाजार समित्यांतील मागणी–पुरवठा संतुलन आणि ग्राहकांची खरेदी क्षमता हेही कांद्याच्या दरनिर्धारणात महत्त्वाचे घटक आहेत.