Tue, Dec 30, 2025

मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित; कोण किती जागा लढणार ?

Written by:Rohit Shinde
Published:
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेत जागावाटपासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. याबाबत आता मोठी अपडेट समोर येत आहे.
मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित; कोण किती जागा लढणार ?

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे, 16 तारखेला निकाल जाहीर होईल. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि शिवसेना-भाजपच्या महायुतीपैकी कोणाची सरशी होणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना आणि भाजपामधील जागावाटपाच्या फॉर्म्युलावर मात्र अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. त्यामुळे याबाबत लवकरच स्पष्टता येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. शिवसेना आणि भाजपं मुंबईसाठीचं जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.

भाजप-शिवसेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित?

भाजप आणि शिंदे सेनेच्या मुंबईतील जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिका निवडणूक 2026 साठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी भाजप 140 आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना 87 जागा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. या महापालिकेमध्ये महायुतीतील अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना मिळून 227 जागा लढवणार आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा आता कधी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यापूर्वी जागावाटपाच्या पहिल्या बैठकीत भाजपने मुंबईत शिंदे गटासाठी फक्त 52 जागा सोडण्याची तयारी दाखवली होती. मात्र, ठाकरे बंधूंच्या युतीनंतर भाजपने आता शिवसेनेला जास्त जागा देऊ केल्या हाेत्या. परंतु, जागावाटपच्या या सूत्रावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब कधी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राज्यातील महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम थोडक्यात

मुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिका निवडणुकांचे बिगुल काही दिवसांपूर्वी वाजलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबाबत मोठी घोषणा केली होती. त्यानुसार, 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी 25 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 ला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. राज्यातील 29 महापालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत.

महत्वाच्या तारखा 

अर्ज स्वीकारणे – २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५
अर्जाची छाननी – ३१ डिसेंबर २०२५
उमेदवार माघारीची मुदत – २ जानेवारी २०२६
चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवाराची यादी – ३ जानेवारी २०२६
मतदानाची तारीख – १५ जानेवारी २०२६
मतमोजणी तारीख – १६ जानेवारी २०२६