Marathi News

सुनेत्रा पवार RSSच्या समितीच्या शाखेत, कंगना रणौतनं केला फोटो पोस्ट, अजित पवार विचार बदलतायेत?

Written by:Smita Gangurde
Published:
अजित पवार एकीकडे शिव शाहू फुले आंबेडकर आणि यशवंतरावा चव्हाणांचं नाव घेतात. मात्र दुसरीकडे त्यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या खासदार आरएसएसच्या बैठकीला उपस्थिती लावतात. त्यामुळं अजित पवारांचा विचार हिंदुत्वाकडे झुकायला सुरुवात झालाय का? असा प्रश्न उपस्थित झालाय.
सुनेत्रा पवार RSSच्या समितीच्या शाखेत, कंगना रणौतनं केला फोटो पोस्ट, अजित पवार विचार बदलतायेत?

नवी दिल्ली- अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतच्या सोशल मीडियावर टाकलेला एक फोटो सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा ठरलाय. कारण हा फोटोच तसा आहे. अजित पवार राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार आणि अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार राष्ट्र सेविका समितीच्या शाखेत उपस्थित असल्याचा हा फोटो आहे. भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत हिनं हा फोटो सोशल मीडियावर टाकलाय.

खासदार सुनेत्रा पवार या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित स्नेहमेळाव्यात उपस्थित होत्या. भाजपा खासदार कंगना रनौतच्या घरी राष्ट्रसेविका समितीच्या शाखेतील हा क्षण फोटोत टिपण्यात आलाय. यावरुन अजित पवारांच्या विचारसरणीवर प्रश्न उपस्थित होतायेत.

राजकारणात दुटप्पी भूमिका नको- रोहित पवार

अजित पवार भाजपासोबत गेले असले तरी धर्म निरपेक्षता आणि यशवंतराव चव्हाणांचा वारसा असल्याचं ते सातत्यानं सांगतायेत. नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनात शिंदे शिवसेनेचे नेते आणि मंत्री संघ मुख्यालयात बौद्धिकासाठी गेले असतानाही, अजित पवारांनी आणि त्यांच्या पक्षांच्या आमदारांनी तिथं जाण्याचं टाळलंय. अल्पसंखाक मुस्लीमांच्या बाजूनं अनेकदा अजित पवार राष्ट्रवादीचे नेते बोलताना दिसतायेत. अशात सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्र सेविका समितीच्या शाखेतल्या उपस्थितीतल्या फोटोनं चर्चेला उधाण आलंय.

अजित पवारांवर टीका करण्याची संधीच विरोधकांना मिळालीये. आमदार रोहित पवारांनी ही संधी सोडलेली नाही. अजित पवार नाहीतर त्यांच्या पक्षाने संघाची भूमिका काय ते जाणून घ्यायचं ठरवल्याची टीका रोहित पवारांनी केलीय. हा फोटो बाहेर आल्यानंतर त्यांना संघाची विचारसरणी पटत असल्याचं दिसतंय, असं रोहित पवार म्हणालेत.राजकारणात दुटप्पी भूमिका लोकांना नको असते, असं सांगत त्यांनी अजित पवारांच्या विचारांवर संभ्रमही निर्माण केलाय.

फोटोत नेमकं काय आहे?

राष्ट्रसेविका समिती ही संघ परिवारातील महिलांसाठी काम करणारी संघटना आहे. ज्यात राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार भाषण किंवा मार्गदर्शन करतायत असं दिसतंय. बाजूला भारतमातेच्या फोटोसह आरएसएसचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींचे फोटो आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम संघाशी संबंधित होता हे नक्की आहे.

सुनेत्रा पवारांचं काय स्पष्टीकरण?

सुनेत्रा पवार यांचं असं म्हणणं आहे की खासदार कंगना रनौत यांच्या निवासस्थानी ही स्नेहपूर्वक भेट आयोजित करण्यात आली होती. कंगना रनौत यांच्या घरी स्नेहपूर्वक कौटुंबिक भेट झाली. या प्रसंगी परस्परांमध्ये स्नेहपूर्ण संवाद साधले गेले
आणि आपुलकीचे क्षण अनुभवता आले. असं सुरुवातीला लिहिलं.

नंतर यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरणही दिलंय. त्यांनी लिहिलंय की, मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या. खासदार म्हणून मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते. त्या बैठकीत विविध राज्यांतील महिला सहभागी होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते. त्या वेळी मला बोलण्यास सांगितले, तर मी फक्त दोन शब्दात माझी भूमिका मांडली. कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये
समाजातील महिलांचे कार्य समजून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच माझा उद्देश होता, आहे आणि राहील.

समिती किंवा संघाचा उल्लेख त्यांनी केलेला नाही. तर कंगनाच्या पोस्टमध्ये महिला सेविका समितीच्या शाखेची बैठक पार पडली सनातन मूल्य, हिंदू संस्कृती, राष्ट्रीय चेतना प्रखर करण्यासाठी ही बैठक झाली, असं लिहिण्यात आलंय.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अडचण

कंगनाचा हा फोटो राजकीय चर्चेत आल्यानंतर अजित पवारांचीही अडचण झाली. वर्धा दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांना हा प्रश्न विचारला असता, मी घरी जाऊून त्यांना विचारतो असं ते म्हणालेत. तसंच सतत त्या काय करतात, हे पाहत नसल्याचं सांगत त्यांनी पत्रकारांची शाळाही घेतली. तर अजित पवार राष्ट्रवादीचे आमादर अमोटल मिटकरी यांनीही यावर आदरणीय वहिनी यांना विचारतो अशी प्रतिक्रिया दिलीय.

अजित पवारांच्या विचारांवर प्रश्न?

अजित पवार एकीकडे शिव शाहू फुले आंबेडकर आणि यशवंतरावा चव्हाणांचं नाव घेतात. मात्र दुसरीकडे त्यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या खासदार आरएसएसच्या बैठकीला उपस्थिती लावतात. त्यामुळं अजित पवारांचा विचार हिंदुत्वाकडे झुकायला सुरुवात झालाय का? असा प्रश्न उपस्थित झालाय. आणि हे सारं सत्तेसाठी करावं लागतंय का, अशीही शंका अनेकांच्या मनात तरळली आहे.

Follow Us :GoogleNews