राज्याच्या कोकण किनारपट्टीवर, पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात मागील आठवड्यापासून पावसाचा जोर टिकून आहे. आज 26 जुलै रोजीदेखील जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह कोकणातील इतर जिल्ह्यांना सलग दुसऱ्या दिवशी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला असून अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने पावसाबाबत नेमका काय अंदाज वर्तवला आहे, ते सविस्तर जाणून घेऊ…
कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून ऑरेंज अलर्ट कायम आहे. आजही या भागांमध्ये जोरदार पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे डोंगराळ भागांमध्ये भूस्खलन होण्याची तसेच नदीकाठच्या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीच्या जवळील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दुसरीकडे पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस या काळात बरसणार आहे. शेतीसाठी हा पाऊस पुरक असून दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकरी वर्गात कमालीचा उत्साह सध्या पाहायला मिळत आहे. आगामी काही दिवसांत या भागात आणखी मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा इशारा
मुंबईत आज काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाने दुसऱ्या दिवशीही ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विशेषतः दुपारनंतर शहरात जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून, यामुळे वाहतुकीवर आणि निचऱ्याच्या प्रणालीवर परिणाम होऊ शकतो.वी मुंबई आणि ठाणे या शहरांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता असून, हवामान विभागाने येथेही ऑरेंज अलर्ट दिला आहे. पावसामुळे दोन्ही ठिकाणी काही सखल भागांत पाणी साचू शकते. तसेच, पावसाचा जोर कायम राहिल्यास रस्त्यांवर खड्डे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास टाळावा, असे प्रशासनाने सांगितले आहे.
हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी शुक्रवारी ऑरेंज अलर्ट जारी केला होता, तर आज 26 जुलै रोजी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना आजच्या दिवशी सुट्टी घोषित केली आहे. नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





