Marathi News

वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळून 30 जणांचा मृत्यू; 23 जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती

Written by:Rohit Shinde
Published:
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळली असून या दुर्घटनेत ३१ जणांचा मृत्यू झाला. तर २३ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे सध्या भाविकांमध्ये घबराट पाहायला मिळत आहे,.
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळून 30 जणांचा मृत्यू; 23 जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती

जम्मू काश्मिरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बुधवारी, २७ ऑगस्ट कटरा येथील वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळली असून या दुर्घटनेत ३१ जणांचा मृत्यू झाला. तर २३ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासानाकडून या भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे सध्या भाविकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

भुस्खलनाच्या वाढत्या दुर्घटनांमुळे चिंता

मुसळधार पावसामुळे, नॉर्दन रेल्वेने बुधवारी त्यांच्या २२ ट्रेन रद्द केल्या आहेत. तर २७ ट्रेन अर्ध्यातच थांबवल्या आहे. यामध्ये वैष्णो देवी बेस कॅम्पवरून धावणाऱ्या नऊ ट्रेनचा समावेश आहे. जम्मू आणि काश्मीरमधील त्रिकुट येथील एका डोंगरावरील मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील मोठी दुर्घटना घडली. या मार्गावर दरड कोसळून रस्ता बंद झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच श्री माता वैष्णो देवी मंदिर समिती, स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. दगड आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली लोक अडकले गेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुसळधार पावसामुळे जम्मूत पुरस्थिती

जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक लहान-मोठ्या नद्यांना आणि ओढ्यांना पूर आलाय. यासोबतच अनेक भागातून दरड कोसळल्याच्या घटना समोर येत आहेत. जम्मूमध्ये एका नदीवरील पूल वाहून गेलाय. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. तर काही ठिकाणी शॉर्ट सर्किट सारख्या दुर्घटना झाल्या आहेत. मंगळवारी सकाळी ११.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अवघ्या सहा तासांत २२ सेमी पावसाची नोंद झाली आहे. रात्री पाऊस थोडा कमी झाल्याने काही भागात पाण्याची पातळी कमी झाली आहे. मात्र, पाऊस अद्याप थांबलेला नाही.

 

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews