उत्तर भारतात यंदा मुसळधार पावसाने चांगलाच कहर केला. पंजाब, जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेशात या राज्यांच मोठे नुकसान झाले. राजधानी दिल्लीला देखील पुराचा तडाखा बसला. अशा परिस्थितीत पंजाबमध्ये अद्यापही परिस्थितीत फार सुधारणा झाल्याचे चित्र दिसत नाही. मुसळधार पाऊस आणि पुराचा धोका कायम आहे.
पंजाबमध्ये पुरामुळे 46 नागरिकांचा मृत्यू
पंजाबमध्ये सध्या मुसळधार पावसाचा कहर आहे. पुरस्थिती निर्माण झाली असून अनेक लोक बेघर झाले आहेत. त्यांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. मृतांचा आकडा सतत वाढत आहे. शनिवारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 46 जणांचा मृत्यू झाला असून, 1.75 लाख हेक्टर जमिनीवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. एनडीआरएफ, बीएसएफ, लष्कर, पंजाब पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकांनी मदत आणि बचाव कार्यात सातत्याने काम केले आहे. सर्वाधिक मृत्यू होशियारपूर आणि अमृतसर मध्ये झाले आहेत, प्रत्येकी 7 जण ठार झाले आहेत. पठाणकोटमध्ये 6, बर्नाला 5, लुधियाना आणि भटिंडा प्रत्येकी 4, मानसा 3, गुरुदासपूर, रूपनगर आणि एसएएस नगर प्रत्येकी 2, पटियाला, संगरूर, फाजिल्का आणि फिरोजपूर प्रत्येकी 1 मृत्यू नोंदला गेला आहे. पठाणकोटमध्ये 3 जण बेपत्ता आहेत.
मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू
सतलज, बियास आणि रावी नद्यांमध्ये पूर आला आहे. याशिवाय हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये देखील कमी प्रमाणात विनाश नोंदला गेला आहे. पंजाबमध्ये पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. आतापर्यंत 22,854 लोकांना बाधित भागातून बाहेर काढण्यात आले आहे. सुमारे 3.87 लाख लोक या पुरामुळे प्रभावित झाले आहेत. पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी सांगितले की, राज्यातील कृषी क्षेत्र, पायाभूत सुविधा, घरे आणि पशुधनावर मोठे नुकसान झाले आहे.
200 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत, जिथे 7,000 हून अधिक विस्थापित लोकांना ठेवण्यात आले आहे. एनडीआरएफच्या 24 पथके आणि एसडीआरएफच्या 2 पथके, तसेच 144 बोटी वापरून बचाव कार्य सुरू आहे. होशियारपूरमधील तांडा आणि मुकेरियन उपविभागात भात, ऊस आणि मका यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे सविस्तर सर्वेक्षण सुरू आहे. बाधित कुटुंबांना वेळेवर भरपाई देण्यात येईल. असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
धरणांमध्ये पाण्याची मोठी आवक
शनिवारी पोंग धरणाची पाणी पातळी 1,394.19 फुट नोंदली गेली, जे अजूनही कमाल मर्यादेपेक्षा चार फुटांपेक्षा जास्त आहे. शुक्रवारी पाण्याचा प्रवाह 99,673 क्युसेक ता, जो शनिवारी कमी होऊन 47,162 क्युसेक झाला. भाक्रा धरणातील पाणी शनिवारी 1,678.14 फुटांवर होते, शुक्रवारी ते 1,678.47 फूट होते. या धरणातून सतलज नदीत पाण्याचा प्रवाह 62,481 क्युसेक आणि विसर्ग 52,000 क्युसेक होता.





