तिरुपती बालाजी, ज्यांना श्री वेंकटेश्वर किंवा श्रीनिवास असेही म्हटले जाते, हे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रद्धास्थान मानले जाणारे देवस्थान आहे. आंध्र प्रदेशातील तिरुमला पर्वतावर वसलेले हे मंदिर जगभरातील कोट्यवधी भक्तांना आकर्षित करते. यामध्ये श्रीमंत आणि धनाढ्य लोकांची संख्या देखील मोठी आहे. सर्वसामान्य जनता देखील आशिर्वादासाठी हजेरी लावत असते. मात्र या तिरूपती बालाजी मंदिरात दिल्या जाणाऱ्या प्रसादात आणि लाडूमध्ये बनावट तुपाचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आंध्रप्रदेशातील तिरूपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूसाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचं तूप दिल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा आणि भक्तांच्या आरोग्याशी खेळ झाल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे.
68 लाख किलो भेसळयुक्त तुपाची ट्रस्टला विक्री
आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती मंदिर तिरुपती तिरुमला देवस्थान यांनाच चुना लावल्याची घटना घडली आहे. भाविकांच्या जीवाशी खेळ करत मंदिराला लुटण्याचा प्रकार घडला आणि देशभरात खळबळ उडाली. प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूसाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचं तूप दिल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. तुपाच्या खरेदीमध्ये २५० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलं. CBI केलेल्या विशेष तपास पथकाच्या SIT चौकशीत अनेक हादरवणारे खुलासे झाले आहेत, ज्यामुळे TTD च्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
तिरूपती देवस्थानाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
या घोटाळ्यातील सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा समोर आला. उत्तराखंडमधील एका डेअरीने ५ वर्षांच्या कालावधीत TTD ला ६८ लाख किलोग्राम तुपाचा पुरवठा केला, ज्याची किंमत अंदाजे २५० कोटी रुपये आहे. CBI च्या तपासात, या डेअरीने कधीही दूध किंवा लोण्याचा एक थेंबही कुठूनही खरेदी केला नव्हता. ज्या संस्थेने कधी दूध-लोणी खरेदी केले नाही, त्यांनी ५ वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात तुपाचा पुरवठा TTD ला कसा केला, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. TTD मध्ये या करोडो रुपयांच्या महाघोटाळ्याची वेळेत नोंद घेणारी कोणतीही व्यवस्था नव्हती का, असा सवाल भक्त आणि यंत्रणा विचारत आहेत.
भक्तांच्या जीवाशी नेमकं कोण-कोण खेळतंय ?
ब्लॅकलिस्ट झाल्यानंतरही डेअरी मालकांनी अन्य तीन फर्म्सच्या नावावर निविदा मिळवून तुपाचा पुरवठा चालू ठेवला. यामध्ये वैष्णवी डेअरी (तिरुपती), माल गंगा डेअरी (उत्तर प्रदेश) आणि ए.आर. डेअरी फूड्स यांचा समावेश आहे. जुलै २०२४ मध्ये TTD ने ‘ए.आर. डेअरी’ कडून आलेले तुपाचे चार टँकर भेसळीमुळे नाकारले होते. मात्र, हे टँकर डेअरी प्लांटमध्ये परत न जाता, त्यांना थेट वैष्णवी डेअरीकडे पाठवण्यात आले. हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्याने देशभरातील भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा परिणाम फक्त आर्थिक स्वरूपाचा नसून याचा नागरिकांच्या आरोग्यावर देखील गंभीर अशा स्वरूपाचा परिणाम होत आहे.





