Air India : हवामानातील तीव्र बदलांचा फटका आता थेट जागतिक विमान वाहतुकीला बसू लागला आहे. जगातील अनेक देशांमध्ये हिमवृष्टीने थैमान घातले असून, अमेरिकेतही भीषण हिमवादळाचा धोका निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसांत अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर शक्तिशाली हिवाळी वादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
या पार्श्वभूमीवर भारताची राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाने अमेरिकेत जाणाऱ्या आणि येणाऱ्या काही विमान सेवा रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, २५ आणि २६ जानेवारी रोजी न्यूयॉर्क आणि नेवार्क मार्गावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
ट्विट करत दिली माहिती (Air India)
एअर इंडियाने आपल्या ट्विटर (X) हँडलवरून माहिती देताना सांगितले की, अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि आसपासच्या भागांमध्ये रविवार सकाळपासून सोमवारपर्यंत जोरदार बर्फवृष्टीसह तीव्र हिवाळी वादळाचा अंदाज आहे. याचा थेट परिणाम विमान वाहतुकीवर होणार असल्याने, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. Air India
टोल फ्री क्रमांक जारी.
दरम्यान, ज्या प्रवाशांनी या तारखांसाठी प्रवासाचे तिकीट बुक केले आहे, त्यांना एअर इंडियाकडून सर्वतोपरी मदत दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी २४×७ कॉल सेंटर
📞 +91 1169329333 / +91 1169329999
या क्रमांकांवर संपर्क साधावा किंवा airindia.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे.
या भीषण वादळाचा परिणाम अमेरिकेतील एकूण विमान वाहतुकीवरही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आठवड्याच्या अखेरीस २,७०० हून अधिक विमाने रद्द करण्यात आली असून, यामध्ये टेक्सासमधील विमानांचा मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे, शुक्रवार रात्रीपर्यंतच ४,२०० पेक्षा जास्त विमाने रद्द झाली असून, त्यामुळे गेल्या नोव्हेंबरमधील विमान रद्दीकरणाचा विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे.






