महाराष्ट्रासह देशभरातील टोल टॅक्स वसूलीचा आकडा वर्षाकाठी वाढतानाच दिसत आहे. पाचशे ते हजार कोटींनी हा आकडा वर्षाकाठी वाढत आहे. टोल वसूलीच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र चौथ्या स्थानावर असल्याची माहिती आहे.

वसूलीची मर्यादा संपली, वसूली थांबेना!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधण्यावर झालेला खर्च वसूल झाल्यानंतर टोल वसूली करता येणार असे सर्वोच्च्च न्यायलयाने याआधीच हे स्पष्ट केले आहे. यानंतरही टोल टॅक्स वसूलीची रक्कम वर्षानुवर्षे वाढतानाच दिसत आहे.

वसूलीची रक्कम वाढतीच

महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गांवर 75 पेक्षा अधिक टोल नाके आहेत, मागील पाच वर्षांत राज्यातील मराठी माणसाने  २१ हजार १०५ कोटींचा टोल दिलेला आहे. यामधील टोल वसूलीची रक्कम दरवर्षी वाढताना दिसत आहे. मर्यादा संपली तरी होणारी टोल वसूली ही एक गंभीर समस्या सध्या नागरिकांसमोर उभी आहे. अशा परिस्थितीत मनसेची राज्यातील आंदोलने थंडावल्यानंतर या टोल वसूलीला अधिक जोर आला होता.

महाराष्ट्रातील टोलनाके हे नागरिकांसाठी मोठ्या मनस्तापाचे कारण ठरत आहेत. अनेक ठिकाणी टोल आकारणी अत्यंत जास्त असून, प्रवाशांना वारंवार पैसे मोजावे लागतात. त्यामुळे आर्थिक बोजा वाढतो. शिवाय, काही टोलनाक्यांवर वाहतुकीची अडथळे, लांबच लांब रांगा आणि तासन्‌तास वाट पाहावी लागते. वेळेचा अपव्यय आणि इंधनाचा खर्चही वाढतो. स्थानिक नागरिकांना देखील सूट मिळत नाही, त्यामुळे त्यांच्यात असंतोष आहे. टोलनाके काढून घेण्याची मागणी वारंवार होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. काही वेळा टोल वसुलीमध्ये अपारदर्शकता आढळते, त्यामुळे नागरिकांचा विश्वासही डळमळीत होतो.

या समस्येवर योग्य उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून नागरिकांचा त्रास कमी होईल आणि वाहतुकीस सुलभता लाभेल.