ढाका- बांग्लादेशात वायूसेनेचं विमान सोमवारी शाळेवर कोसळलं. या अपघातात 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यात 16 विद्यार्थी, 2 शिक्षक आणि विमानाच्या पायलटचा समावेश आहे.
या अपघातात 164 पेक्षा जास्त जणं जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. अनेक जखमींना हातगाडीवरुन रुग्णालयात नेत असल्याचे व्हिडीओही समोर आले आहेत. तर काही विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टरमधून रुग्णालयात नेण्यात आल्याचीही माहिती आहे.
हे ही वाचा
चिनी बनावटीचं विमान कोसळल्यानं अपघात
बांग्लादेशी सैन्याच्या वायूदलाचं एफ 7, बीजीआय हे विमान दुर्घटनाग्रस्त झालंय. हे विमान चीनमध्ये तयार करण्यात आलं होतं. दुर्घटना घडली त्यावेळी शाळा भरलेली होती आणि वर्ग सुरु असताना अचानक हे विमान शाळेवर कोसळलं. दुर्घटनेनंतर एका दिवसाच्या राजकीय शोकाची घोषणा सरकारच्या वतीनं करण्यात आलीय.
मोहम्मद युनूस यांच्याकडूनही श्रद्धांजली
बांग्लादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलंय. त्यांनी फेसबुक पोस्ट लिहून शोक व्यक्त केला आहे. यात लिहिलंय की, या विमान अपघातात वायूदलाचे सदस्य, नाईलस्टोन शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांच्यासह ज्यांचं नुकसान झालं ते कधीही भरुन येणारं नाही. हा देशासाठी अत्यंत दु:खाचा क्षण आहे. जखमींनी लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रिया युनूस यांनी दिलीय.
दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश
परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आदेश अधिकारी आणि रुग्णालयांना देण्यात आले आहेत. त्यासोबतच जखमींना सर्वोतोपरी मदतीचं आश्वासनही युनूस यांनी दिलंय. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
चीनमध्ये तयार झालेलं विमान कोसळलं
एफ 7 बीजीआय बांग्लादेश एयरफोर्सचं मल्टीरोल फायटर जेट होतं. चीनच्या चेंगदू जे-7 फायटरचं हे अडव्हान्स व्हर्जन होतं. रशियाच्या मिग-21 च्या धर्तीवर हे फायटर जेट तयार करमण्यात आलं होतं. बांग्लादेश एयरफोर्सनं 2011 ते 2013 या काळात हे फायटर खरेदी केलं होतं. थंडरकॅट स्क्वाड्रनमध्ये या फायटर जेटचा समावेश करण्यात आला होता.