बँक कर्मचाऱ्यांचा उद्या संप, सरकारी बँकांमध्ये सलग चौथ्या दिवशी कामकाज ठप्प; सामान्य नागरिकांच्या अडचणी वाढणार

Published:
ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (AIBOC) चे सरचिटणीस रूपम रॉय यांनी सांगितले की, मार्च 2024 मध्ये वेतन सुधारणा कराराच्या वेळी इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि UFBU यांच्यात सर्व शनिवार सुट्टी जाहीर करण्याबाबत सहमती झाली होती.
बँक कर्मचाऱ्यांचा उद्या संप, सरकारी बँकांमध्ये सलग चौथ्या दिवशी कामकाज ठप्प; सामान्य नागरिकांच्या अडचणी वाढणार

देशातील कोट्यवधी सामान्य नागरिकांसाठी उद्या, म्हणजेच मंगळवारीही बँकिंग सेवा उपलब्ध होणार नाहीत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने पाच दिवसांचा कार्यआठवडा तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी 27 जानेवारी रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. या संपाचा परिणाम मंगळवारी सरकारी बँकांच्या कामकाजावर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, सरकारी बँकांमध्ये सलग चौथ्या दिवशी कामकाज ठप्प राहणार आहे.

गेल्या आठवड्यापासूनच देशातील बँका बंद आहेत. शनिवारी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद होत्या, त्यानंतर रविवार आणि आज प्रजासत्ताक दिनानिमित्तही सर्व बँका बंद राहिल्या. आता मंगळवारी संपामुळे सरकारी बँकांचे व्यवहार होणार नाहीत.

23 जानेवारीच्या बैठकीनंतर संपाची घोषणा

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 9 संघटनांचा संयुक्त मंच असलेल्या UFBU ने हा संपाचा निर्णय 23 जानेवारी रोजी मुख्य कामगार आयुक्तांसोबत झालेली सलोखा बैठक अपयशी ठरल्यानंतर घेतला. UFBU घटक असलेल्या ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) चे सरचिटणीस सी. एच. वेंकटचलम यांनी सांगितले की, “सलोखा बैठकीदरम्यान सविस्तर चर्चा होऊनही आमच्या मागण्यांवर कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे संपावर जाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाही.”

ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (AIBOC) चे सरचिटणीस रूपम रॉय यांनी सांगितले की, मार्च 2024 मध्ये वेतन सुधारणा कराराच्या वेळी इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि UFBU यांच्यात सर्व शनिवार सुट्टी जाहीर करण्याबाबत सहमती झाली होती.

सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याची खंत

रूपम रॉय म्हणाले, “सरकार आमच्या वाजवी मागणीवर प्रतिसाद देत नाही, हे दुर्दैवी आहे. यामुळे कामाच्या तासांचे नुकसान होणार नाही, कारण आम्ही सोमवार ते शुक्रवार दररोज 40 मिनिटे अतिरिक्त काम करण्यास तयार आहोत.”
UFBU च्या आणखी एका घटक संघटनेचे, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज (NCBE) चे सरचिटणीस एल. चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले की, “हा आंदोलन ग्राहकांविरोधात नाही, तर टिकाऊ आणि मानवीय बँकिंग व्यवस्थेसाठी आहे. पाच दिवसांचा बँकिंग आठवडा ही लक्झरी नसून आर्थिक आणि मानवी गरज आहे.”

सरकारी बँकांवर परिणाम, खासगी बँका सुरू

या संपामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया आदी सरकारी बँकांच्या शाखांमधील रोख जमा-उचल, चेक क्लिअरन्स आणि प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि अ‍ॅक्सिस बँक यांसारख्या प्रमुख खासगी बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे, कारण या बँकांचे कर्मचारी संपात सहभागी नाहीत.