पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघातील वाराणसीतल्या मणिकर्णिका घाटाच्या जीर्णोद्धारावरुन देशात सध्या राजकारण चांगलंच तापलंय. या पुनर्विकासात घाटाच्या चबुतऱ्यावर असलेल्या मूर्ती तोडण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. तर व्हायरल होत असलेले व्हिडीओ हे एआयनी तयार केले असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलंय.
वाराणसीतल्या याच मणिकर्णिका घाटाच्या जीर्णोद्धारावरुन सध्या राजकीय वातावरण तापलंय. या घाटाच्या नूतनीकरणावेळी, चबुतऱ्यावर असलेल्या काही देवतांच्या आणि महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा तोडण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. सोशल मीडियावर याबाबतचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काँग्रेस, सपा आणि आपकडून या मुद्द्यावरुन भाजपवर टीका करण्यात आली. या वादानंतर महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या परिवाराशी संबंधित ट्रस्टनं यशवंतराव होळकरांच्या नेृतृत्वात वाराणसीचा दौरा केला. या घाटावर असलेल्या मूर्ती सुरक्षित ठेवण्यात आल्या असल्याचं प्रशासनाकडून त्यांना आश्वस्त करण्यात आलं. स्थानिकांकडून होत असलेला विरोध, विरोधकांची टीका यामुळं हा मुद्दा तापू लागलाय.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही वाराणसीचा दौरा करत या भागाची पाहणी केली. भाजपची बदनामी करण्यासाठी एआय निर्मित व्हिडीओ व्हायरल करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. काही व्हायरल व्हिडीओत कुम्भामहादेव मंदिर तोडण्यात आल्याचेही व्हिडीओ आहेत. मात्र प्रत्यक्षात ते मंदिर सुरक्षित असल्याचं योगींनी सांगितलं. तर योगी आदित्यनाथ खोटं बोलत असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरच्या विकासानंतर मणिकर्णिका घाटाच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन २०२३ मध्ये करण्यात आलं होतं.
मणिकर्णिका घाटाचं पौराणिक महत्त्व
१. या घाटावर असलेल्या स्मशानातील चितेची राख कधीही विझत नाही
२. या घाटावर अंत्यसंस्कार झाल्यास मोक्ष मिळतो अशी श्रद्धा
३. सनातन धर्मावर श्रद्धा ठेवणारे भाविक देश विदेशातून घाटावर येतात
४. मणिकर्णिका घाटाचं मोठं धार्मिक, पौराणिक आणि आध्यात्मिक महत्त्व
5. औरंगजेबानं केलेल्या विध्वंसानंतर महाराणी अहिल्याबाई होळकरांकडून घाटाचा जीर्णोद्धार
व्हिडिओ पसरवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
या सगळ्या घटनेनंतर पोलीस प्रशासनही सतर्क झालं असून, चुकीचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या ८ जणांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली आहे. यात आपचे नेते संजय सिंह आणि काँग्रेस नेते पप्पू यादव यांचाही समावेश आहे. या मुद्द्यावर स्थानिक जनतेतही आक्रोश दिसतोय. पाल समाजाच्या वतीनं वाराणसीत आंदोलन करण्यात आलं. मात्र पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळं हे आंदोलन चिघळलंय. आपचे नेते संजय सिंह यांनी वाराणसीत चार दिवस पदयात्रा करण्याचं जाहीर केलंय. एकूणच वाराणसीतल्या मणिकर्णिका घाटाचं राजकारण आता देशपातळीवर पोहचताना दिसतंय.





