मुंबईत उभारलं जाणारं बिहारभवन कसं असेल? लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण होणार; राजकारण तापलं!

Written by:Smita Gangurde
Published:
मुंबईत येत्या काळात बिहार भवनाचा मुद्दा मराठी अस्मितेच्या राजकारणाचा पुढचा अंक ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबईत उभारलं जाणारं बिहारभवन कसं असेल? लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण होणार; राजकारण तापलं!

मुंबईत मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद पुन्हा रंगण्याची चिन्ह आहेत. यावेळी वादाचं निमित्तं ठरलंय बिहार भवन. मुंबईत बिहार भवनाला विरोध करणारे राज ठाकरे महाराष्ट्राचे राजे आहेत का, असा सवाल बिहारच्या एका मंत्र्यानं केलाय. यावरुन राजकारण तापलंय. मुंबईत महापालिका निवडणुकांच्या धामधुमीत बिहार सरकारनं मुंबईत बिहार भवन बांधण्याची केलेली घोषणा वादात सापडलीय.

मुंबईच्या पोर्ट ट्रस्ट परिसरात बिहारमधील जनतेसाठी हे भवन उभारण्यात येणार आहे. मुंबईत बिहार भवन बांधण्याचं कारण स्पष्ट करायला हवं, असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही हेतूबाबत साशंकता व्यक्त केलीय. तर बिहार भवनला विरोध करणाऱ्यांनी मुंबईत हार भवन उभारावं असा टोला भाजपनं मनसेसह विरोधकांना लगावलाय.

कसं असेल मुंबईतील बिहारभवन?

1. मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरात बिहार उभारण्याची घोषणा 2. 30 मजली बिहार भवनासाठी 314.20 कोटींचा खर्च
3. दिल्लीतील बिहार भवनाप्रमाणे सर्व सुविधांनी युक्त
4. सरकारी कामकाज, बैठकांसाठी जागांची व्यवस्था
5. सभागृह, कार्यालये आणि आधुनिक पार्किंगची व्यवस्था
6. भवनात एकूण 178 खोल्या, 240 बेडची डॉर्मेट्री
7. बिहारमधील रहिवाशांना निवास, कामकाजासाठी उपयोग
8. बिहारमधून मुंबईत येणारे प्रवासी आणि रुग्णांना मोठा फायदा
9. बिहार भवनासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार

बिहारमधून येणाऱ्यांची संख्या वाढण्याची भीती

सध्या भवनाच्या परिसराची सीमा भिंत पूर्ण झालीय. भवनाच्या कामासाठी सल्लागार नेमला गेला असून लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मुंबईत येणाऱ्या बिहारमधील नागरिकांसाठी हे बिहार भवन महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या निमित्तानं बिहारमधून येणारे लोंढे आणखी वाढतील, त्यामुळं याला मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही विरोध होणार हे निश्चित आहे. मुंबईत येत्या काळात बिहार भवनाचा मुद्दा मराठी अस्मितेच्या राजकारणाचा पुढचा अंक ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.