अवघ्या देशात गेल्या काही महिन्यांपासून बिहार विधानसभेच्या निवडणुकांची चर्चा सुरू होती. त्याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. एनडीएचं जागा वाटप आज निश्चित झालं असलं तरी यासंदर्भातील घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 10 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे.
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवार 17 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करु शकतात. तर, उमेदवारी अर्ज मागं घेण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर आहे. बिहार मध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबरला होणार आहे.
एनडीएचं जागावाटप जवळपास निश्चित
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेंबांधणी सुरु आहे. सत्ताधारी एनडीएचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जदयू सर्वाधिक जागा लढणार आहे. जदूयनंतर भाजप जागा लढेल. नितीशकुमार यांचा पक्ष जदयू 102 जागा लढवेल. भाजप 101 जागांवर निवडणूक लढवेल. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षाला 25 जागा मिळू शकतात. केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी आवाम मोर्चाला 8 जागा मिळतील. तर उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएम पक्षाला 7 जागा मिळतील.
बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम
मतचोरीचे गंभीर आरोप, राज्य सरकारनं जाहीर केलेल्या अनेक योजना, महिलांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात आलेले पैसे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बिहारमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होईल. ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान घेतलं जाईल. १४ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षातील राष्ट्रीय जनता दल यांनी दोन टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे भाजप हा सत्तेतला, तर राजद हा विरोधी बाकांवरील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजप आणि राजदचे ७० पेक्षा अधिक आमदार विधानसभेत आहेत. दोन्ही बड्या पक्षांनी केलेली मागणी निवडणूक आयोगानं मान्य केली आहे.
राज्यात एकूण ७.४३ कोटी मतदार आहेत. यामधील ३.९२ पुरुष आणि ३.५० कोटी महिला मतदार आहेत. ७.२ लाख दिव्यांग मतदार आहेत. राज्यातील तरुण मतदारांचा (२० ते २९ वर्षे) १.६३ कोटींच्या घरात आहे. तर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांची संख्या १४.०१ लाख इतकी आहे.






