नवी दिल्ली – बिहारच्या नितीन नबीन यांची भाजपाच्या १२ व्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झालीय. मंगळवारी भाजपा मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. नितीन नबीन हे आता आपले बॉस आहेत, असं वक्तव्य भाषणात पंतप्रधआन मोदींनी केलं. भाजपाचे आत्तापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष असलेल्या नबीन यांच्यासमोर नवी आव्हानंही असणार आहेत.
जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बिनविरोध निवडून आलेत. बिहारचे नितीन नबीन हे भाजपाचे राष्ट्रीय अध्य़क्ष झाले आहेत.दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे मावळते कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. वयाच्या ४५ व्या वर्षी जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी नितीन नबीन यांची निवड झालीय. आत्तापर्यंतच्या भाजपाच्या १२ अध्यक्षांपैकी नबीन हे सर्वात तरुण अध्यक्ष झाले आहेत.
नितीन नबीन माझे बॉस- पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी भाजप ही संस्कृती असल्याचं सांगत आता नितीन नबीन हे आपले बॉस झाले असल्याचं वक्तव्य केलंय. तर राष्ट्र प्रथम या आदर्शावर काम करणार असल्याचं नितीन नबीन म्हणालेत. सोमवारी भाजप मुख्यालयात राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक झाली. इतर कोणत्याही उमेदवारानं अर्ज भरला नसल्यानं नबीन यांची बिनविरोध निवड झाली. १४ डिसेंबर २०२५ ला त्यांची भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
नितीन नबीन यांचा परिचय
१. बिहारमधील भाजप नेते आणि माजी आमदार नवीन किशोर सिन्हा यांचे पुत्र
२. वडिलांच्या निधनानंतर 2006 साली राजकारणात सक्रिय
3. बांकीपूर मतदारसंघातून पाच वेळा आमदार
4. भाजयुमोचे अध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्रीपदाचा अनुभव
5. ईशान्येतील राज्यांत पक्षाचे प्रभारी आणि पर्यवेक्षक म्हणून काम
6. बिहारमध्ये मंत्रिमंडळात कामाचा अनुभव
7. छत्तीसगडमध्ये भाजपाच्या विजयात मोठा वाटा
8. लो प्रोफाईल आणि सर्वपक्षीयांशी चांगले संबंध
नितीन नबीन यांच्यासमोर काय आव्हानं?
४५ वर्षीय नितीन नबीन यांच्याकडे भाजपाचं राष्ट्रीय अध्यक्षपद सोपवत, भाजपानं तिसऱ्या फळीतील नेत्यांना मोठी जबाबदारी देण्यास सुरुवात केल्याचं मानण्यात येतंय. नितीन नबीन यांच्यासमोर पुढच्या दोन वर्षांत होणाऱ्या ११ महत्त्वाच्या निवडणुकांचं आव्हान असणार आहे.
नबीन यांच्या कार्यकाळात महत्त्वाच्या निवडणुका
१. 2026 सालात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम विधानसभा निवडणुका
2. 2027 साली उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूर विधानसभा निवडणुका
3. 2027 सालातील राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक
पुढची २५ वर्ष भाजपसाठी महत्त्वाची आहेत. २०४७ सालापर्यंत विकसीत भारताचं ध्येय गाठण्यासाठी केंद्र सरकार आणि भाजप प्रयत्नशील आहे. या वाटचालीत नितीन नबीन यांच्यासारख्या युवा चेहऱ्याकडे पक्षाचं नेतृत्व देत भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न होताना दिसतोय.





