Bullet Train : मुंबई–पुणे–हैदराबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा अर्थसंकल्प २०२६–२७ मध्ये औपचारिकपणे करण्यात आली असून, महाराष्ट्रासह कर्नाटक आणि तेलंगणासाठी ही मोठी पायाभूत सुविधा ठरणार आहे. देशातील सात नवीन हाय-स्पीड रेल्वे मार्गांपैकी हा एक महत्त्वाचा कॉरिडॉर मानला जात आहे. या मार्गामुळे तीन राज्यांदरम्यानचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, अर्थव्यवस्थेवर त्याचा थेट सकारात्मक परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रासाठी फायदेशीर (Bullet Train)
मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे जात असताना, केंद्राने घोषित केलेला हा नवा मार्ग विशेषतः पुणेकरांसाठी आणि दक्षिण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. प्रस्तावित मार्गानुसार मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होणार आहे. सध्या रस्त्याने किंवा रेल्वेने हा प्रवास दीड ते तीन तास घेतो. या नवीन मार्गामुळे दैनंदिन प्रवास करणारे व्यावसायिक, आयटी कर्मचारी आणि उद्योग क्षेत्रातील अनेक जण मोठ्या प्रमाणात वेळ वाचवू शकतील. त्याचबरोबर पुणे ते हैदराबाद प्रवास फक्त १ तास ५५ मिनिटांत पूर्ण होणार असल्याने महाराष्ट्र आणि तेलंगणामधील उद्योग, व्यापार, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्रासाठी नवी संधी निर्माण होणार आहे. Bullet Train
किती अंतर ?? कुठे कुठे थांबणार
या हाय-स्पीड मार्गाची एकूण लांबी अंदाजे ७६७ किलोमीटर असेल. या संपूर्ण मार्गावर ११ महत्त्वाची स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. यात नवी मुंबई, लोणावळा, पुणे, दौंड, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, कलबुर्गी, जहिराबाद आणि हैदराबाद यांचा समावेश आहे. या स्थानकांमुळे केवळ मोठी शहरेच नव्हे तर ग्रामीण भागही उच्च-गती रेल्वेच्या जाळ्यात समाविष्ट होणार आहे. विशेषतः पंढरपूर आणि अकलूजसारख्या भागांपर्यंत अशी सुविधा पोहोचणे हा त्या प्रदेशासाठी मोठा टप्पा मानला जात आहे.
या प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक संधींचा विचार करता, तीन राज्यांतील औद्योगिक पट्ट्यांना नवी गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. पुणे, सोलापूर, कलबुर्गी आणि हैदराबाद हे उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असल्याने, त्यांच्यातील वेगवान संपर्क वाढल्यास अनेक नवीन गुंतवणुका आकर्षित होण्याची शक्यता वाढेल. तसेच हाय-स्पीड रेल्वेमुळे मालवाहतूक आणि लॉजिस्टिक व्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
या सात हाय-स्पीड कॉरिडॉरच्या विकासासाठी सुमारे १६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) कडे असेल. मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम ५६ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले असून, २०२७ पर्यंत काही भाग सुरू करण्याचे लक्ष्य आहे. याच धर्तीवर मुंबई–पुणे–हैदराबाद कॉरिडॉरचे कामही टप्प्याटप्प्याने गती घेईल.
या प्रकल्पामुळे पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन टिकाऊ वाहतूक प्रणालीकडे भारत वाटचाल करीत आहे. रेल्वे मंत्रालयाकडून हा प्रकल्प केवळ प्रवासाचा वेळ कमी करणारा नसून, भविष्यातील आर्थिक वाढीला चालना देणारा महत्वाचा घटक ठरेल, असे संकेत दिले गेले आहेत. या कॉरिडॉरच्या अंतिम मंजुरीनंतर कामाला सुरुवात झाल्यास पुढील काही वर्षांत महाराष्ट्र आणि दक्षिण भारताचा विकास वेगाने पुढे सरकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






