भारताला एकीकडे पाकिस्तानच्या कुरापतींनी हैराण केलेले असताना चीनची खेळी थांबताना दिसत नाही. चीनने आता मोठे पाऊल उचलले आहे. भारताच्या सीमेजवळ दक्षिण पूर्व तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीवर एका मोठ्या धरणाच्या बांधकामाला चीन देशाने सुरुवात केली आहे. डिसेंबर 2024 मध्येच या योजनेला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आता या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. या धरणामुळे सामरिक दृष्ट्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने भारताला अनेक धोके संभवतात. नेमकी काय परिस्थिती आहे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू…
सामरिक दृष्टीने भारताला धोका
चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी या योजनेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात भाग घेतला. हा कार्यक्रम तिबेटमधील निंगची भागात झाला. हा परिसर भारतातील अरुणाचल प्रदेशच्या अगदी जवळ आहे त्यामुळे भारताला धोका वाढला आहे. कारण दुसऱ्या देशांना त्रास देणे, त्यांची नाकाबंदी करणे, धमकावून जमिनी बळकावणे असेच उद्योग चीन आजवर करत आला आहे. त्यामुळे नेहमीच्या विस्तारवादी वृत्तीचा एक भाग म्हणून या धरणाच्या कामाच्या सुरूवातीकेड पाहिले जात आहे.
पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार
रताला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. ही नदी अरुणाचल प्रदेशमधून भारतात प्रवेश करते आणि पुढे आसाम व बांगलादेशात वाहते. चीनने धरण बांधल्यास भारताच्या उत्तर-पूर्व भागातील पाण्याच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे पुराच्या किंवा दुष्काळाच्या परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय, या धरणामुळे भारताच्या जलसुरक्षेवर तसेच पर्यावरणावरही विपरित परिणाम होऊ शकतो. भारताने या प्रकल्पाबाबत चिंता व्यक्त केली असून दोन्ही देशांमध्ये संवादाची आवश्यकता आहे. जलसंपत्तीवरचा हा वाद पुढे जाऊन सामरिक स्वरूपही घेऊ शकतो, जो संपूर्ण दक्षिण आशियासाठी धोकादायक ठरू शकतो.
अरूणाचलच्या मुख्यमंत्र्याचा इशारा
चीनच्या या धरणाच्या कामावर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी काही दिवसांपूर्वी गंभीर इशारा दिला होता. त्यांचे म्हणणे होते की हा प्रोजेक्ट भारताची सुरक्षा आणि अस्तित्वासाठी धोका ठरू शकतो. या प्रोजेक्टवर चीन तब्बल 167 अब्ज डॉलर्स खर्च करणार आहे. यामध्ये पाच हायड्रोपावर स्टेशन तयार केले जाणार आहेत. याद्वारे मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाणार आहे. यांग्त्जी नदीवर तयार करण्यात आलेल्या थ्री गॉर्जेस प्रकल्पातून तयार होणाऱ्या विजेपेक्षा ही वीज कितीतरी जास्त असेल.






