काँग्रेसच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील आमदारांना नोटीस पाठवून विचारणा केली आहे. आमदारांना या नोटिसीचे उत्तर देणं बंधनकारक आहे. ‘तुम्ही जन सुरक्षा विधेयकाला विरोध का नाही केला?’ असा प्रश्न काँग्रेस हायकमांडने नोटिसद्वारे पक्षाच्या सर्व आमदारांना विचारला आहे. या विधेयकाला प्रत्येक स्तरावर विरोध करा, असे काँग्रेस हायकमांडने आमदारांना निर्देश दिले होते. त्यामुळे या निर्देशांचे पालन न झाल्याने आमदारांना आता नोटीस पाठविण्यात आली आहे.
जनसुरक्षा विधेयकाला विरोध न केल्याने नोटीस
याबाबत अधिकची माहिती अशी की, बुधवारी जन सुरक्षा विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर झालं. सरकारनुसार त्यांनी हे विधेयक दहशतवादी विचारांना खतपाणी घालणाऱ्या संघटनांवर कारवाई करण्यासाठी आणलं आहे. पोलिसांना डाव्या विचारसरणीच्या संघटना आणि बंडखोरांविरुद्ध कारवाई करताना अडचण येते, म्हणून हा कायदा आणण्यात आला आहे. मात्र या विधेयकाला काँग्रेसने विधानसभा आणि विधान परिषदेत हवा तसा विरोध केला नाही. त्याची काँग्रेस हायकमांडने गंभीर दखल घेतली आहे. काँग्रेस हायकमांडने या प्रकरणी थेट पक्षाच्या आमदारांना नोटीस बजावून जाब विचारला आहे.
विशेष म्हणजे हे विधेयक सभागृहात मंजूर होत असताना काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी एकत्र सभागृहातून वॉकआऊट केलं. पण यानंतर त्यांनी कुठलेही विरोध प्रदर्शन केलं नाही. त्यामुळे कदाचित काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील आपल्या पक्षाच्या आमदारांवर नाराज होऊन नोटीस पाठवली. त्यामुळे आमदारांना आता हायकमांडच्या या नोटीसीला उत्तर द्यावे लागणार आहे. उत्तर देणे बंधनकारक असल्याची माहिती समोर येत आहे.
जनसुरक्षा विधेयकातील नेमक्या तरतुदी काय?
राज्य सरकार शहरी नक्षलवाद किंवा त्यामुळे सम्बंधित संघटनांना बेकायदेशीर संस्था घोषित करू शकते. या संस्थांची मालमत्ता, कार्यालये, बँक खाती जप्त करता येतात. राज्यातील अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्याचा उद्देश यामागे आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्यास आरोपांशिवाय आरोपींना ताब्यात घेता येणार. त्याचबरोबर या कायद्यानुसार वरिष्ठ पोलीस निरिक्षक किंवा त्या पेक्षा वरच्या रँकचा अधिकारी चौकशी करेल. चार्जशीट ADG लेवल अधिकाऱ्याच्या मंजुरीनंतर दाखल होईल. राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका ठरणाऱ्या संघटनांविरुद्ध थेट कारवाई करता येईल. संघटनांचे बँक अकाऊंट सुद्धा गोठवता येतील. अशा अनेक तरतुदी यामध्ये असणार आहेत.






