संविधानातील ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ शब्दांवरून वाद; भारतीय संविधानात कधी-कधी संशोधन झाले?, जाणून घ्या

Published:
Last Updated:
संविधानातील ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ शब्दांवरून वाद; भारतीय संविधानात कधी-कधी संशोधन झाले?, जाणून घ्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) महासचिव दत्तात्रेय होसबोले यांनी संविधानाच्या प्रस्तावनेमधून “समाजवाद” आणि “धर्मनिरपेक्षता” हे शब्द काढून टाकण्याबाबत विचार करण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं आहे. आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी संविधानाच्या प्रस्तावनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यामुळे देशभरात मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी RSS आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले दत्तात्रेय होसबोले?

होसबोले म्हणाले की, “समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे दोन शब्द नंतर प्रस्तावनेत जोडले गेले. तर मग प्रश्न उपस्थित होतो की, हे शब्द राहावेत का?” त्यांनी सूचकपणे विचारलं की, या मुद्द्यावर सार्वजनिक चर्चा व्हायला हवी.

वाद का निर्माण झाला?

आणीबाणीच्या ५० वर्षांच्या पार्श्वभूमीवर होसबोले यांनी संविधानातील ४२व्या घटनादुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यांनी सांगितलं की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या मूळ प्रस्तावनेत हे शब्द नव्हते. १९७६ साली इंदिरा गांधी यांच्या सरकारने आणीबाणीच्या काळात हे शब्द प्रस्तावनेत समाविष्ट केले. त्यामुळे या दुरुस्तीवर आता नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

भारतीय संविधानात किती वेळा बदल झाले आहेत?

भारतीय संविधानाला २६ जानेवारी २०२५ रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात संविधानात विविध कारणांनी अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या. शिकागो विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, १७८९ नंतर जगभरात अस्तित्वात आलेल्या सुमारे २०० संविधानांपैकी बहुतेकांची सरासरी ‘आयुर्मर्यादा’ फक्त १७ वर्षे होती. मात्र भारताचं संविधान आज ७५ वर्षे पूर्ण करूनही प्रभावीपणे लागू आहे, ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

संविधानात आजपर्यंत किती दुरुस्त्या झाल्या?

पहिली घटनादुरुस्ती: १८ जून १९५१

आत्तापर्यंत एकूण घटनादुरुस्त्या: १०६

अंतिम (१०६वी) दुरुस्ती: २८ सप्टेंबर २०२३

यामध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी एक तृतीयांश जागा आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Follow Us :GoogleNews