केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी गुडन्यूज दसऱ्याच्या मुहूर्तावर समोर आली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक गुड न्यूज दिली आहे. सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाईत वाढ करण्याची घोषणा केली आहे. महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांची दिवाळी यामुळे गोड होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यास मान्यता दिली आहे.
48 लाख कर्मचाऱ्यांना निर्णयाचा फायदा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. दसरा आणि दिवाळीसारख्या सणांपूर्वी सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीचा फायदा अंदाजे 48 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना होईल. याव्यतिरिक्त, महागाई भत्ता दर 55% वरून 58% पर्यंत वाढवण्यात आला आहे.
या वर्षीची ही दुसरी महागाई भत्तावाढ आहे. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत ही सुधारणा शेवटची असण्याची अपेक्षा आहे. आता करण्यात आलेली महागाई भत्त्यातील ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची थकबाकी दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या पगारासह दिली जाणार आहे. त्यामुळे एकूणच कर्मचाऱ्यांसाठी दुधात साखर पडल्यासारखी ही स्थिती आहे.
पेन्शन आणि पगार किती वाढणार?
एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 50,000 असेल, तर त्यांना आतापर्यंत 55% डीए दराने 27500 रुपये मिळत होते. आता, डीए 3 टक्क्यांनी वाढल्याने 58 टक्के झाला आहे. त्यामुळे यानुसार आता त्यांना 29,000 रुपये मिळतील. यामुळे त्यांच्या पगारात दरमहा 1500 रुपयांनी वाढ होईल. त्याचप्रमाणे, जर एखाद्या पेन्शनधारकाचे मूळ पेन्शन 25,000 रुपये असेल, तर 55% डीआर दराने 13750 रुपये मिळत होते. आता, 58% डीए दराने त्यांना 14500 रुपये मिळतील. यामुळे त्यांच्या पेन्शनमध्ये दरमहा 750 रुपयांनी वाढणार आहे.
त्यामुळे ऐन दिवाळीत मोदी सरकारने कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा असा हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्व स्तरांतून सध्या या निर्णयाचे कौतुक होताना दिसत आहे. शिवाय कर्मचाऱ्यांना देखील या निर्णयामुळे काम करण्यास प्रेरणा मिळणार आहे.
#WATCH | Union Minister Ashwini Vaishnaw says, “The Union Government has approved an increase in Dearness Allowance and Dearness Relief by 3%, effective from July 1.” pic.twitter.com/qvsO4a9IxR
— ANI (@ANI) October 1, 2025





