गोव्याहून दिल्लीकडे विमान निघालं; पोहोचलं अहमदाबादला…नेमकं काय घडलंय?

Written by:Rohit Shinde
Published:
दाट धुक्यामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाल्याचा फटका गोव्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या उड्डाणालाही बसला. नियोजित वेळेत दिल्ली गाठणे शक्य न झाल्याने हे विमान मध्यरात्री अहमदाबादकडे वळवण्यात आले.
गोव्याहून दिल्लीकडे विमान निघालं; पोहोचलं अहमदाबादला…नेमकं काय घडलंय?

थंडीच्या हंगामात दाट धुके आणि वाढलेल्या प्रदूषणामुळे हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. सकाळच्या वेळेत धुक्याची तीव्रता जास्त असल्याने विमानांच्या उड्डाणात विलंब किंवा रद्द होण्याच्या घटना वाढतात. दृश्यमानता कमी झाल्यामुळे वैमानिकांना सुरक्षित लँडिंग करणे कठीण होते. त्याचबरोबर प्रदूषित हवेमुळे एअरपोर्टवरील उपकरणांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. अशीच एक घटना गोव्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या विमानाच्या बाबतीत घडली आहे. दाट धुक्यामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाल्याचा फटका गोव्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या उड्डाणालाही बसला. नियोजित वेळेत दिल्ली गाठणे शक्य न झाल्याने हे विमान मध्यरात्री अहमदाबादकडे वळवण्यात आले.

दिल्लीकडे विमान निघालं; पोहोचलं अहमदाबादला…

उत्तर भारतात दाट धुक्यामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाल्याचा फटका गोव्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या उड्डाणालाही बसला. नियोजित वेळेत दिल्ली गाठणे शक्य न झाल्याने हे विमान मध्यरात्री अहमदाबादकडे वळवण्यात आले. जयपूर विमानतळावर आधीच विमानांची गर्दी आणि कमी दृश्यमानता असल्याने हा निर्णय घेण्यात आला. या घटनेमुळे प्रवाशांना अचानक प्रवासातील बदलांना सामोरे जावे लागले.

गोव्यातील मोप्पा विमानतळावरून रात्री 11.55 वाजता उड्डाण घेतलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) वेळेत उतरता आले नाही. परिणामी, हे विमान अहमदाबाद विमानतळाकडे वळवण्यात आले आणि तेथे सुरक्षितपणे उतरवण्यात आले. त्यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. हे उड्डाण रात्री उशिरा सुरू झाले होते. विमानाचे दिल्लीतील IGI विमानतळाच्या टर्मिनल-1 वर पहाटे 2.35 वाजता लँडिंग नियोजित होते. मात्र, त्याच वेळेस उत्तर भारतात दाट धुके असल्याने ही अडचण निर्माण झाली.

एअर इंडियाच्या विमानासोबत नेमकं काय घडलं ?

दिल्ली आणि जयपूर परिसरात दाट धुके पसरल्यामुळे हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. विशेषतः जयपूर विमानतळावर दृश्यमानता कमी असल्याने अनेक विमाने तिथे उतरवता आली नाहीत. परिणामी, जयपूरकडे वळवण्यात आलेली अनेक विमाने आधीच तेथे पोहोचली होती, त्यामुळे विमानतळावर प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली. जयपूर विमानतळ आधीच इतर उड्डाणांनी भरलेला असल्याने आणि धुक्यामुळे सुरक्षित लँडिंग शक्य नसल्याने, एअर ट्रॅफिक कंट्रोलने संबंधित एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान अहमदाबादकडे वळवण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अहमदाबाद विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरवल्यानंतर प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले. विमान कंपनीकडून प्रवाशांना पुढील प्रवासाबाबत माहिती देण्यात आली असून, पर्यायी व्यवस्था किंवा पुढील उड्डाणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. काही प्रवाशांनी अचानक झालेल्या बदलामुळे गैरसोयीची तक्रार केली, तर काहींनी सुरक्षिततेसाठी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले.

दरम्यान, उत्तर भारतातील दाट धुक्यामुळे विमान, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम होत असून, पुढील काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांनी प्रवासापूर्वी अद्ययावत माहिती घेण्याचे आवाहन विमान कंपन्या आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना तासन्‌तास विमानतळावर थांबावे लागते, त्यामुळे मानसिक तणाव वाढतो. हवामान विभागाच्या सतर्कतेनुसार विमान कंपन्या विशेष खबरदारी घेत असल्या तरी थंडीतील धुके हवाई वाहतुकीसाठी मोठे आव्हान ठरत आहे.